नाशिक - राज्य शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या सहकार्याने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची इमारत उभी राहणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाला गती देवून सर्व सुविधांनी पूर्ण आराखडा तयार करावा, अशा सूचना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक येथे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाची इमारत व महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीसाठी राज्य शासनामार्फत 60 टक्के व आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत 40 टक्के निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे मुख्य सचिवांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पाच्या कामकाजाला सुरुवात करावी. तसेच भविष्यातील पुढील प्रकल्पांना अनुकरणीय ठरावी अशी या इमारतीची उत्कृष्ट रचना करण्यात यावी. इमारतीचा आराखडा तयार करण्यासाठी लवकर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्याच्या सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामुळे जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेत वाढ होणार असून या प्रकल्पामुळे भविष्यात नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देता येईल. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाला गती देण्यात यावी, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
नवीन प्रकल्पासाठी मार्गदर्शक ठरेल अशी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीची रचना करण्यात यावी. तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा, जेणेकरुन कामकाज गतीने होईल. तसेच जिथे अडचण जाणवल्यास प्रशासनाच्या वतीने सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
यावेळी बैठकीला महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिकेचे उपायुक्त मनोज घोडे-पाटील, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे समन्वयक डॉ. संदीप गुंडरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.एन.राजभोज, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी एन.व्ही.कळसकर, विधी अधिकारी संदीप कुलकर्णी उपस्थित होते.
हेही वाचा - कोरोनाची तिसरी लाट दीड ते दोन महिन्यांत येणार- एम्सचा इशारा