नाशिक - शहरातील दुकाने उद्यापासून सम-विषम पद्धतीने, नवीन नियम आणि अटींच्या शर्तीवर सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय आज मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, सर्व विभागीय अधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीत शहरातील कापड व्यापारी , सराफ असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक्स ,धान्य किराणा, कृषी अवजारे, दुकानांसह विविध असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे राज्यातील अनेक शहरांमधील बाजारपेठा बंद आहेत. मात्र, आता राज्यातील अर्थ चक्र पूर्वपदावर यावे याकरता सरकारने सम विषम फॉर्म्युला वापरुन दुकाने सुरू करण्या संदर्भात आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शुक्रवारी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व बाजारपेठांच्या व्यापाऱ्यांची बैठक बोलावून संबंधित आदेशाची माहिती दिली आहे.
उद्यापासून शहरातील दुकाने सम-विषम फॉर्म्युल्यानुसार सुरू होणार आहेत.मात्र, यावेळी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कधी कोणती दुकान सुरू ठेवायची याचा निर्णय करण्यात येणार आहे,याबाबत नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
प्रशासनाच्या या निर्णयाला बाजारपेठांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी देखील सहमती दर्शवली आहे. मात्र, ज्या ठिकाणी रस्ते लहान आहेत अरुंद आहेत, अशा ठिकाणी हा फॉर्म्युला कसा वापरला जाईल.असा सवाल व्यापाऱ्यांनी विचारला आहे. दुकानांची वेळ 9 ते 5 ऐवजी 9 ते 7 करावी, अशी मागणी बाजार पेठ संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे
महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील बाजारपेठा नियम आणि अटींच्या अधीन राहून सुरू करण्यास परवानगी देण्यात आलीय. मात्र, व्यापाऱ्यांनी देखील प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व अटींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. नाशिक शहरात कोरोनाचा वाढत असलेला प्रदुर्भाव बघता नाशिककरांनी देखील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी न करता प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करून कोरोनाचा प्रसार होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे,असे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.