मनमाड - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून नांदगांव तालुका किसान सभेतर्फे भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. खादगाव ही येथून रॅली काढून मनमाड बाजार समितीच्या आवारात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते.
जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा केला निषेध-
गेल्या 56 दिवसांपासून दिल्लीत नवीन शेतकरी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून आज किसान सभेतर्फे देशभरात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. नांदगाव तालुका किसान सभेतर्फे खादगाव येथून रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग यांनी केले त्यांच्या सह शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रॅली काढून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खादगाव ते मनमाड कृषि उत्पन्न बाजार समितीपर्यंत रॅली आल्यानंतर रॅलीचे छोट्या सभेत रूपांतर झाले. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. यावेळी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस देविदास भोपळे, साधना गायकवाड यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी व शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शीख बांधवांचा रॅलीत सहभाग-
दिल्लीत सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात पंजाब आणि हरियाणा येथील शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज देशभरात यासाठी पाठिंबा म्हणून आंदोलन करण्यात आले. यास मनमाड गुरुद्वारा येथील प्रबंधक यांच्या नेतृत्वाखाली शीख बांधवांनी सहभाग नोंदवला होता.