नाशिक - शहरासह पंचवटी परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या मानसिकतेवर होत आहे. कोरोना होईल या भितीपोटीच पंचवटी भागातील तुळजाभवानी नगरमधील एका व्यक्तीने स्वत:चा गळा धारदार हत्याराने चिरून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अशोक दामोदर कालेवार ( वय. 46, रा. तुळजाभवानी नगर, नवीन मार्केट यार्ड, पेठरोड, पंचवटी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच दुसरीकडे नागरिकांच्या मानसिकतेवर या रोगाचा विपरित परिणाम होत आहे. कोरोनाबद्दल अद्याप कुठल्याही लसीचा शोध लागलेला नाही. तर, याचे रुग्णदेखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांची उपासमार झाली, व्यवसाय बंद पडले. या सर्वांचा परिणाम लोकांच्या मानसिकतेवर होत आहे.
पंचवटी परिसरातील तुळजाभवानी नगरमध्ये राहणाऱ्या अशोक कालेवार यांनीही बुधवारी राहत्या घरात स्वत:च्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून घेतले. त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये कुटुंबियांनी उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे.