नाशिक : Mahatma Gandhi Jayanti २०२३ : परदेशात जाताना महात्मा गांधीजींकडून समुद्र ओलांडले गेल्याने मोड वणिया समाजाने महात्मा गांधी यांना समाजातून बहिष्कृत केले होते. पुन्हा समाजात येण्यासाठी त्यांना नाशिकच्या गोदावरी नदीच्या रामकुंड तीर्थावर तीन वेळा डुबकी मारावी लागली होती. 'सत्याचे प्रयोग' या गांधीजींच्या आत्मचरित्र्यात या घटनेची नोंद असल्याचं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं.
महात्मा गांधींना मदत करणाऱ्यालाही दंड: कृष्णा चांदगुडे लिखित 'जात पंचायतींना मूठमाती' या पुस्तकात महात्मा गांधींना कशाप्रकारे सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागले याची माहिती आहे. 'सत्याचे प्रयोग' या गांधीजींच्या आत्मचरित्रात या घटनेची नोंद आहे. परदेशी जाताना गांधीजींकडून समुद्र ओलांडले जाणार असल्याने मोड वणिया जातीत खळबळ उडाली होती. त्यांच्या समाजातील कोणीही परदेशी गेले नव्हते. त्यामुळे जातीची सभा बोलवण्यात आली व गांधीजींना त्याचा जाब विचारण्यात आला; मात्र महात्मा गांधी हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे त्यांना बहिष्कृत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महात्मा गांधी यांना मदत करणाऱ्याला जाब विचारण्यात येईल तसेच संबंधिताला सव्वा रुपये दंड करण्यात येईल, असे जातपंचायतीत ठरले.
समुद्र ओलांडणे पाप होते: समुद्र ओलांडून जाणे म्हणजे पाप आहे व विदेशात धर्म सांभाळता येणार नाही; कारण तेथे साहेब लोकांसोबत खावे प्यावे लागणार आहे अशी सर्वांचीच धारणा होती. पुढे परदेशातून परत आलेल्या गांधीजींना जातीत परत घेतले जावे यासाठी गांधीजींनी नाशिकच्या गोदावरी नदीपात्रातील रामकुंडात तीन वेळा डुबकी मारावी लागली. तसेच त्यांना राजकोटला आपल्या बांधवांना भोजन दिल्यानंतर त्यांना पुन्हा जातीत घेतले गेले.
गांधीजींना लपून छपून दिले जात होते जेवण: त्याकाळात गांधीजी यांची भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे ही प्राथमिकता होती. बहिष्कृत असताना त्यांना सासू-सासरे किंवा बहिणीकडे पाणीही पिता येत नव्हते; मात्र ती मंडळी गुप्तपणे गांधीजींना खायला देत असत. जी गोष्ट उघडपणे करता येत नाही ती लपून छापून करणे महात्मा गांधींना मान्य नव्हते.
हेही वाचा:
- Gandhi Jayanti 2023 : महात्मा गांधींच्या सूचनेनुसार वाराणशीत बांधण्यात आलं होत मंदिर, 'या' मंदिराची खासियत पाहून मिळतो सर्वधर्मभावाचा संदेश
- Forest Labourers Protest : गांधी जयंतीच्या दिवशी वनमजुरांचे मागण्यांसाठी 'सामूहिक आत्महत्या' आंदोलन
- International Day of Non-Violence : आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन का साजरा केला जातो , महात्मा गांधींशी काय आहे संबंध, जाणून घ्या...