नाशिक - जिल्ह्यातील येवला या छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात आज शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांना इशारा दिला. तसेच आपला अंदाज चुकला असे सांगून पवारांनी येवलेकरांची माफी मागितली. मात्र पुन्हा येईन तेव्हा अशी चूक झालेली दिसणार नाही, असा टोलाही भुजबळ यांचे नाव न घेता पवारांनी लगावला.
शरद पवार यांची आज सभा होत असल्याने दोन दिवसांपासून त्याची तयारी सुरू होती. यावेळी येवले या पैठणीच्या राजधानीत शरद पवार नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. नुकतेच अजित पवार यांच्याबरोबर येवल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करताना येवल्याची निवड केली. येथे येऊन ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी यावेळी सांगितले की, माझा अंदाज चुकला म्हणून माफी मागायला आलो आहे. पवारांनी यावेळी येवलेकरांची माफी मागितली.
सभेमध्ये बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, संकटात काही सहकाऱ्यांनी साथ सोडली. त्याची मनामध्ये खंत आहे. मात्र आपण पुन्हा लढण्यासाठी तयार आहे. नवीन सहकारी निर्माण होतील. त्यांना आपले पाठबळ देण्याची विनंतीही पवारांनी यावेळी केली. आपण येथे कुणावरही टीका करण्यासाठी आलो नाही तर, माफी मागण्यासाठी आलो आहे, असे सुरुवातीलाच शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच भाषणामध्ये पवारांनी कोणत्याही विरोधकाचे किंवा पक्ष सोडून गेलेल्या नेत्याचे नाव घेतले नाही. त्याचवेळी चुकीच्या गोष्टी दुरुस्त करायला हव्यात असेही पवार म्हणाले. अनेक संकटात सहकाऱ्यांनी साथ सोडली नाही. मात्र आता काही सहकारी साथ सोडून गेले आहेत. त्यांची कमीही भरून काढता येईल अशा आशयाचा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
मी पुन्हा येईन, त्यावेळी योग्य निकाल देईन, असेही पवार यांनी सांगितले. आमच्यात कुणी भ्रष्टाचारी असेल तर जरुर चौकशी करा असे आव्हानही यावेळी शरद पवार यांनी दिले. जर कुणी दोषी असेल तर कडक शिक्षा करा असेही पवार यावेळी म्हणाले. वय झाले हे खरे आहे. मात्र उगीच वयाच्या गोष्टी आम्हाला कुणी शिकवू नये. धोरणात्मक टीका करा उगीच वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा सज्जड दमच शरद पवार यांनी दिला. जनतेच्या विश्वासाला तडा बसेल असे पाऊल कुणी टाकले असेल तर तर त्याला त्याची किंमत आज ना उद्या मोजावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला. यावेळी सभास्थळी शरद पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारनिष्ठ नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतभेद म्हणजे शत्रुत्व नाही- माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, की भारतीय जनता पक्षाने प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा आणि विरोधकांना कमकुवत करण्याचा डाव आखला आहे. मी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि पीव्ही नरसिंह राव यांचे राजकारण पाहिले आहे, या सर्वांनी विरोधी पक्षांबद्दल टीका केली. पण त्यांनी कधीही विरोधकांना गप्प बसविण्याचा प्रयत्न केला नाही. संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्षाइतकाच विरोधी पक्षालाही महत्त्व असते. भाजपकडून 2024 मध्ये लोकसभेत बहुमत सुनिश्चित करण्यासाठी इतर पक्षांमध्ये फूट पाडण्यात येत आहे. हे लोकशाहीसाठी अत्यंत हानिकारक आहे. ज्यांच्याशी आपले मतभेद आहेत, त्यांना आपण आपले शत्रू मानत नाही, असेही राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले. मतभेद म्हणजे शत्रुत्व नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा-