भुसावळ - मार्चमध्ये राज्याची वीज मागणी तब्बल २२ हजार मेगावॅटपर्यंत जाते. मात्र, यंदा चित्र उलट असून, कोरोनामुळे प्रथमच वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. राज्यात केवळ १४ हजार ६०० मेगावॅट तर महावितरणला केवळ १३ हजार ८६ मेगावॅटची गरज भासत असल्याने महानिर्मितीने भुसावळसह नाशिक, परळी, खापरखेडा व चंद्रपूर येथील एकूण १४ वीजनिर्मिती केंद्र बंद केले आहेत.
उन्हाळ्यात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्याची वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. महावितरणला किमान १८ हजार तर राज्याला २२ हजार मेगावॅट विजेची गरज भासते. मात्र सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे राज्यभरातील औद्योगिक वसाहतींमधील अनावश्यक उद्योगही बंद आहेत. शेतकरीही बांधावर न जाता घरातच असल्याने कृषी, औद्याेगिक व व्यावसायिक या तिन्ही प्रमुख क्षेत्रांतील वीजेची मागणी कमी झाली आहे. यामुळे महानिर्मितीने भुसावळातील दोन, नाशिकचा एक, परळीचे तीन, खापरखेडा व चंद्रपूर येथील प्रत्येकी चार असे एकूण १४ वीजनिर्मिती संच बंद केले आहेत. यामुळे सरासरी तीन हजार मेगावॅट वीजेची निर्मिती मागणी अभावाने थांबली आहे. एकंदरित महानिर्मितीला मार्च महिन्यापासून वीजेचे उत्पन्न वाढवावे लागते. एप्रिल व मे महिन्यात तर उच्चांकी वीजनिर्मिती करून राज्याची गरज भागवावी लागते. मात्र, यंदा मार्चमध्येच वीजेची मागणीच घटल्याने महानिर्मितीला १४ संच बंद करण्याची वेळ आली आहे. मार्च महिन्यात संच बंद करण्याची ही पहिलीची वेळ आली आहे.
कोळसा वाहतूक सुरळीत
कोरोनामुळे भारतीय रेल्वे लॉकडाऊन करण्यात आली असली तरी कोळशाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आहे. मात्र, सध्या महानिर्मितीचे १४ संच बंद असल्याने कोळशाबाबतही टंचाई नाही. आवश्यकतेनुसार कार्यरत असलेल्या संचांसाठी कोळसासाठा दिला जात आहे.
४ हजार मेगावॅट निर्मिती
राज्यभरात महानिर्मितीचे ३० औष्णिक वीजनिर्मिती संच आहेत. त्यातून १० हजार १७० मेगावॅट वीजेची निर्मिती करता येते. मात्र १४ संच बंद आहेत. केवळ १६ संचांमधून ४ हजार मेगावॅट वीजेची निर्मिती होत आहे. ती गेल्या पंधरवड्यापूर्वी ७ हजार मेगावॅट होती.
आवश्यकतेनुसार निर्मिती
लॉकडाऊनच्या काळात राज्यातील वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे १४ संच बंद केले. आगामी काळात विजेची मागणी वाढल्यानंतर ते गरजेनुसार कार्यान्वित होणार असल्याची माहिती महानिर्मिती कंपनीकडून देण्यात आली आहे.