नाशिक - मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राज्यमहार्गावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील दक्षिण भागात जाण्यासाठी असलेल्या एकमेव रेल्वे ओव्हरब्रिजवरील रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. यामधून रस्ता काढत काढत जाणे म्हणजे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर मालेगाव-मनमाड-कोपरगाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड तर्फे रस्त्यांची डागडुजी न करता 'टोलधाड' सुरूच आहे.
एमएमकेपीएल अर्थात मालेगाव मनमाड कोपरगाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे इंदूर पुणे राज्य महामार्गावर मालेगाव ते कोपरगाव असा रस्ता बीओटी तत्वावर बनविण्यात आलेला आहे. गेल्या 15 वर्षांपासून या रस्त्यावर या कंपनीने टोल आकारणी सुरू केली आहे. मात्र, मालेगाव ते कोपरगावपर्यंत या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. या कंपनीतर्फे या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात डागडुजीच्या नावावर फक्त मुरूम टाकण्यात येतो. तसेच या मार्गावर यंदा 15 टक्के भाववाढ करून मोठ्या प्रमाणावर टोल वसुली सुरू आहे. या टोलधाडीबाबत अनेकदा तक्रार करूनही प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे शहरातील नागरिकांना तसेच या रस्त्यावरून नियमित ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे, तर आर्थिक शोषण होऊनही कुठलीही सुविधा नसल्याने नागरिकांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातून जाणारा हा एकमेव महामार्ग आहे. त्यामुळे यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यातच शहरातील स्मशानभूमीजवळ असलेल्या एका पुलाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे रोज सकाळपासूनच वाहतूक कोंडी होत असते.
इंदूर-पुणे राज्य महामार्गावर असलेल्या एमएमकेपीएल कंपनीने या मार्गावर असलेले खड्डे बुजवावे. तसेच टोलवसुली शिथिल करावी. राज्याशासनाच्या नियमानुसार रस्त्यावर सुविधा नसतील तर टोल घेण्याचा अधिकार नाही. मात्र, या कंपनीची सर्रासपणे 'टोलधाड' सुरूच आहे. याबाबत काही निर्णय घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालक करीत आहेत.