मनमाड (नाशिक) - जगभरात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरू असून देशात याचा प्रसार टाळण्यासाठी लॉकडाऊन केले झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी अडकलेल्यांना अनेक सामाजिक संस्थांनी मदतीचा हात दिला आहे. नाशकातील मनमाड शहर लोहमार्ग पोलिसांनीही (जीआरपी) आज गोरगरिबांना अन्नवाटप करत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. या पोलिसांनी शहरात अडकलेल्या प्रवासी आणि गोरगरिबांना जेवण, बिस्किटे आणि पाणी वाटप केले.
मनमाड हे रेल्वेचे जंक्शन आहे. येथे रेल्वे बंद होण्याआधी जे जे प्रवासी अडकले त्यांच्यासाठी मनमाड नगरपालिकेने निवाऱ्याची व्यवस्था केली. मात्र, त्यांच्या जेवणाची होणारी अडचण लक्षात घेता आज लोहमार्ग पोलिसांनी आज अन्न, पाणी आणि बिस्किटे वाटली. या उपक्रमातून लोहमार्ग पोलिसांची माणुसकी नजरेस पडली आहे. त्यांच्यातर्फे एकवेळ अन्न वाटप करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे अनेक अडचणी येत आहेत. प्रवास करण्यासाठी रेल्वे, बसेस, टॅक्सी बंद आहेत. यामुळे अडकलेल्या प्रवाशांना पोलीस अन्न वाटप करत आहे. तसेच, अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेऊन योगदान देत आहेत.