नाशिक- इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्तसंचार वाढला आहे. आज सकाळी वासाळी येथील एका शेतकऱ्याने शेतीच्या रक्षणासाठी बांधून ठेवलेल्या कुत्र्याचा बिबट्याने फडशा पडल्याची घटना समोर आली आहे. प्रसंगावधान राखून या शेतकऱ्याने या थरारक दृश्याचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रण केले.
इगतपुरी तालुक्यातील वासाळी गावाजवळ बबन रघुनाथ झोले यांची शेती आणि घर आहे. या शेतीतील पिकाची वानरे नुकसान करतात. त्यामुळे ते पाळलेल्या कुत्र्याला शेताच्या बांधावर बांधून ठेवतात. आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी शेताच्या बांधावर कुत्रे बांधून ते नाश्ता करण्यासाठी घरात आले. यावेळी त्यांनी आपल्या दोन मुलांना कुत्र्यासाठी भाकर घेऊन पाठविले. हे मुले भाकर घेऊन जात असताना त्यांना कुत्र्याला बिबट्या ठार करुन ओढत असल्याचे दिसले. या मुलांनी घरी येऊन घटना सांगितले. घटनास्थळी कुटुंबातील सदस्य येईपर्यंत बिबट्या पसार झाला होता.
हेही वाचा-नंदुरबार: साक्री वनहद्दीवर मृतावस्थेत आढळला बिबट्या
असा झाला मोबाईल कॅमेऱ्यात कैद बिबट्या...
शेतकरी झोले यांनी मृत कुत्र्याला थोड्या अंतरावर नेऊन साखळीने लाकडाला बांधले. तेथे मोबाईलचा कॅमेरा चालू करून ते घरी परतले. अर्धा तासानंतर सर्वजण कुत्रा बांधलेल्या ठिकाणी गेले. तेव्हा कुत्र्याचा मृतदेह गायब झाल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ मोबाईल तपासला असता त्यात बिबट्या मृत कुत्र्याला फरफटत घेऊन जात असल्याचे चित्रण झाले झाले होते.
हेही वाचा-नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश; करमाळ्यात आतापर्यंत घेतले तीन बळी
काही दिवसांपूर्वीच बिबट्याने बालिकेला केले होते ठार-
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ईगतपुरी भागातच बिबट्याने बालिकेवर हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली होती. तर वन विभागाने या भागातून दोन बिबटे पिंजरा लावून जेरबंद केले होते. मात्र, तरीही पुन्हा बिबट्याचे या भागात दर्शन झाले. या भागात बिबट्याचा वावर वाढला असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. या बिबट्याचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्या तालुक्यात नरभक्षक बिबट्याने तीन जणांचे प्राण घेतले आहेत. या बिबट्याला ठार करावेत, असे आदेश राज्याचे मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी दिले आहेत.