नाशिक - पळसे गावात शनिवारी रात्री बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता. एकाचवेळी अनेक बिबटे दिसल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. दरम्यान, एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे ग्रामस्थांना समजले. त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानुसार घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी येण्यास निघाले असता, बिबट्याने पिंजऱ्यातून धूम ठोकली. पिंजऱ्याचे दार व्यवस्थित लॉक झाले नसल्याने बिबट्या पळून जाण्यात यशस्वी झाला असावा, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
पळसे येथील टेंभीमळा भागात शनिवारी दुपारी ऊसतोड सुरू असताना पाच बिबटे दिसले होते. बिबटे दिसल्याची माहिती पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी वन विभागास दिली. त्यानुसार याठिकाणी सायंकाळी पाच वाजता पिंजरा लावण्यात आला होता. रात्री साडेआठच्या दरम्यान शेतकरी ज्ञानेश्वर किसनराव गायधनी व इतर शेतकरी ट्रॅक्टर घेऊन जात असताना पिंजरा लावलेल्या ठिकाणी चार बिबटे दिसले व पिंजऱ्याचा दरवाजाखाली पडलेला दिसला. पिंजऱ्यातून बिबट्याचा आवाज येत असल्याने ज्ञानेश्वर यांनी पोलीस पाटील सुनिल गायधनी यांना माहिती दिली. पोलीस पाटील व ग्रामस्थांनी याठिकाणी गेल्यावर खात्री केली. त्यांनी वन विभाग व पोलिसांशी संपर्क साधला. वन विभागाचे अधिकारी व नाशिकरोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी या ठिकाणी हजर झाले. तोपर्यंत बिबट्याने पिंजऱ्यातून धूम ठोकली. पिंजऱ्याचे दार व्यवस्थित लॉक झाले नसल्याने बिबट्या पळून गेला असावा, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
बिबट्या नर, मादी आणि तीन बछडे या परिसरात असण्याची शक्यता वर्तविली जाते. दोन वर्षांपुर्वी याच भागात भाऊसाहेब शामराव गायधनी यांच्या शेतात उसतोड सुरु असताना तीन बछडे आढळून आले होते, ते हेच असण्याची शक्यताही शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.