नाशिक - नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात एकाच जीव गेला आहे. नाशिक तालुक्यातील वडगाव शिवारात एका पाच वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला करुन तिला ठार केले आहे.
वन्यजीव सप्ताहाच्या पूर्वसंध्येला घडली दुर्दैवी घटना
नाशिक तालुक्यातील गिरणारे गावापासून जवळ असलेला वडगाव शिवारात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या ठिकाणी राहणारे बाळू निंबेकर यांची मुलगी शिवन्या ही घराच्या पडवीत खेळत असताना असताना, अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला केला आणि त्यात ती गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांनी तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जिल्हा रुग्णालयात जाऊन याबाबतची माहिती घेतली आहे. ही घटना वन्यजीव सप्ताह पूर्वसंध्येला घडडी आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पश्चिम वनविभागाचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी रात्री या परिसरात पिंजरा लावला आहे. वन विभागाच्या कर्मचार्यांकडून गस्त वाढवली जात असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : आरेत पुन्हा एकदा बिबट्याचा हल्ला, तरूण जखमी; 15 दिवसांतील सातवी घटना