नाशिक - दिल्लीत शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा आणि केंद्र सरकारला जाग यावी यासाठी डाव्या पक्षांच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातही विविध ठिकाणी किसान सभा आणि आयटकच्या वतीने वाहने आणि घरांवर काळे झेंडे लावून केंद्र शासनाचा निषेध नोंदवण्यात आला.
हेही वाचा - अंगावरील कपडे काढताच रुग्णालयाने परत केले पैसे; नाशिकातील घटना
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज सहा महिने पूर्ण झाले, तरीही यावर केंद्र शासन काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे, या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी, तसेच केंद्र शासनाला आज सात वर्षे पूर्ण होऊन देखील या सात वर्षांत केंद्र शासनाने केवळ शेतकरी, कर्मचारी आणि कामगार यांच्या विरोधात कायदे आणल्याने केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी आज देशभरातील शेतकरी, कामगार आणि कर्मचारी संघटनांनी एकत्र येत देशव्यापी आंदोलन केले. यात नाशिक जिल्ह्यातील चांदवड, कळवण, देवळा, सटाणा यांसह विविध ठिकाणी किसान सभा आणि आयटकच्या वतीने वाहने आणि घरांवर काळे झेंडे लावून केंद्र शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. तर, अनेक ठिकाणी केंद्र शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून घोषणाबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांना पाठविले
देशात लसीकरण धोरण निश्चित नसल्यामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तर, देशातील सर्व नागरिकांना मोफत लस उपलब्ध झाली पाहिजे, शासकीय आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, कोरोना काळात काम करणार्यांना प्रोत्साहन भत्ता, विमा संरक्षण आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, यांसह वेगवेगळ्या मागण्यांसाठी तयार करण्यात आलेले निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले. तर, मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात आणखी तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सघटनेच्या वतीने देण्यात आला.
हेही वाचा - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच नाशिकमध्ये अंत्यसंस्कारासाठी गर्दी ओसरली