नाशिक - भाजपचे राज्य उपाध्यक्ष आणि माजी आमदार वसंत गीते यांनी आयोजित केलेल्या मिसळ पार्टीला सर्वच पक्षातील नेते उपस्थित होते. वसंत गीते यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. गीते यांच्या या मिसळ पार्टीची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगताना पाहायला मिळत आहे.
माजी आमदार वसंत गीते यांना नाशिक महानगर पालिकेवर पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे श्रेय आहे. शिवसेनेचे पहिले महापौर, मनसेचे पहिले आमदार म्हणून व महापालिकेत मनसेची सत्ता आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. मात्र मनसेतील गटातटाच्या राजकारणामुळे गीते यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता. पक्षाने त्यांच्यावर राज्य उपाध्यक्ष पदाची धुरा सोपवली होती. तसेच त्यांचा मुलगा प्रथमेश गीते यांच्या गळ्यात उपमहापौर पदाची माळ घातली होती. मात्र अस असताना देखील वसंत गीते यांना भाजपाने 2019 च्या विधानसभेचे तिकीट नाकारले होते, त्यामुळे ते भाजपवर नाराज आहेत. त्यातच आज गीतेंनी मिसळ पार्टीचे आयोजन करून, सर्व पक्षातील नेत्यांना आमंत्रण दिल्याने गीते पक्ष बदलणार असल्यांच्या चर्चांना उधान आले आहे.
मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर
एकेकाळी नाशिक शहरात राज ठाकरे नंतर माजी आमदार वसंत गीते यांची भूमिका निर्णायक मानली जातं होती. वसंत गीते असताना महानगरपालिकेत 40 नगरसेवक पाठवून महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकवण्यात आणि शहरात मनसेचे तीन आमदार निवडून आणण्यात त्यांचे मोठे योगदान होते. मात्र त्यानंतर मनसेतून गिते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र गिते यांच्या आजच्या पार्टीला मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
पक्ष बदलणार नाही
कोरोनामुळे अनेक दिवस राजकीय मित्र भेटू शकले नाहीत. म्हणून नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी मिसळ पार्टीचे आयोजन केलं, त्या निमित्ताने सगळे एकत्र आल्याचा आनंद आहे. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. भाजपाने मला विधानसभेचे तिकीट दिले नाही, मात्र आज माझा मुलगा भाजपचा नगरसेवक आहे. या पार्टीच्या आयोजनामागे कुठलाही राजकीय हेतू नव्हता अशी माहिती गीते यांनी दिली आहे.