नाशिक - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांना आजारपणामुळे जामीन देण्यात आला, असे म्हणणे चुकीचे आहे. त्यांना प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार न्यायालयाने जामीन दिला आहे, असे साध्वीचे वकील रामेश्वर गीते यांनी म्हटले आहे.
गेल्या २००९ पासून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे प्रकरण गीतेंकडे आहे. त्यांना त्यांच्या शिक्षेच्या काळात दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात होती. त्यामुळे त्यांचे मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण झाले. परिणामी त्यांना अनेक शारीरिक व्याधींना बळी पडावे लागले होते. त्यामुळे साध्वींनी करकरेंबद्दल, असे वक्तव्य केले असल्याचे गीते म्हणाले.
विशेष न्यायालय त्यावेळी मकोका न्यायालयात होते. अलीकडच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मकोकाच्या तरतुदी गाळल्या गेल्या आहेत. त्यावेळी मकोका न्यायालयाकडे अर्ज करून त्यांच्या मानसिक खच्चीकरणाच्या गोष्टी रेकॉर्डवर आणल्या होत्या. त्याविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती, असेही ते म्हणाले.
गेल्या २००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणमध्ये आझाद नगर येथे गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ते प्रकरण महाराष्ट्र शासनाकडे सुपुर्द करण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण मुंबई येथील विशेष न्यायालयात चालले. त्यावेळी साध्वीच्या जामीनासाठी ४ ते ५ अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, तो अर्ज विशेष न्यायालय आणि उच्च न्यायालयाने फेटाळला होता. मध्यंतरीच्या काळात शासनाने उच्च न्यायालय येथे याचिका दाखल केली होती. हे प्रकरण उच्च न्यायालय येथे चालू असताना साध्वींना जामीन दिला असल्याचे गीते म्हणाले.