मनमाड (नाशिक) - मनमाड शहरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून गेल्या दोन दिवसात 16 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिक्षकांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय अधिक्षकांनी तीन दिवसात अनेक बैठकांना हजेरी लावल्याने शहरातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
मनमाड शहरात कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. शहर व परिसरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 187 झाली आहे. यापैकी 101 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर सध्या 80 अॅक्टिव्ह रुग्ण असून काही रुग्णांवर मनमाड येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये तसेच काही रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत.
मनमाड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली असताना शहरात नवे 16 रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यूदेखील झाला आहे. कोरोनाबधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. सध्या शहरातील कोरोना सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील नवीन पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या घरातील स्वॅब घेण्यात आले असून, त्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
प्रशासन एवढी काळजी घेत असताना नागरीक हलगर्जीपणा करत आहेत. अनेक ठिकाणी विनाकारण गर्दी करणे, काम नसताना गावात फिरणे, मास्क न वापरणे यामुळे देखील संसर्ग वाढत आहे. तसेच आता पावसाळ्याच्या दिवसात नव्याने रुग्ण वाढण्याची शक्यता देखील डॉक्टरांनी बोलून दाखवली आहे.
शहरात एकूण 29 कंटेंनमेंट झोन तयार करण्यात आले असून, कंटेंनमेंट झोन भागातील नागरिकांना घरपोच सुविधा देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर पालिका आणि पोलीस दोघांकडूनदेखील कारवाई करण्यात येत आहे. वीस दिवसाआधी बदली केलेले मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांची कालच प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, आज पुन्हा त्यांची नाशिकच्या सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. यामुळे मनमाड शहर पुन्हा वाऱ्यावर सोडले आहे.
कोरोना अपडेट
एकूण रुग्ण - 187
बरे झालेले -101
उपचार सुरू - 80
मयत रुग्ण - 6