नाशिक: नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी (saptashrungi) गडावर कीर्तिध्वज (kirti dhwaj) ध्वज फडकवला गेला. (kirti dhwaj on saptashrungi). सुमारे 40 हजार भाविकांनी या वेळी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. दरवर्षी अश्विन नवमीच्या मध्यरात्री सप्तशृंगी गडाच्या शिखरावर हा ध्वज लावला जातो. दरेगाव येथील गवळी परिवार हे हा ध्वज लावण्याचे मानकरी असुन गेल्या कित्येक वर्षापासुन हा अदभुत सोहळा पार पाडण्याचे काम हे परिवार करत आहे. या ध्वजाची विधीवत पुजा देवी संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई व ध्वजाचे मानकरी गवळी परिवार यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापन व प्रशासकीय प्रतिनिधी, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
600 वर्षाची परंपरा: या ध्वजाचा पुजा विधी करण्यासाठी रात्री 12 वा शिखरावर जाऊन 10 फुट लांब काठी, 11 मीटर केशरी कापडाचा ध्वज, पुजेसाठी गहु, तादुळ, कुंकु, हळद, जाणाऱ्या मार्गात विविध ठिकाणांच्या देवतांसाठी लागणारे पूजेचे साहित्य, नैवेद्य इत्यादी साहित्य सोबत घेऊन जावे लागते. काल दुपारी 12 वाजता श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात किर्ती ध्वजाची विधिवत पूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्तांच्या हस्ते करून किर्तीध्वजाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यानंतर हा ध्वज फडकवण्यासाठी दरेगावचे गवळी पाटील परिवार मार्गस्थ झाले.
समुद्र सपाटीपासून 4569 फुट उंचीवर सप्तशृंगगड आहे. वर्षभरातून दोन वेळा हा किर्तिध्वज सप्तशृंगी देवीच्या शिखरावर फडकीवला जातो. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी मध्यरात्री व नवरात्रौत्सव विजयादशमीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री भगवे निशाण शिखरावर फडकीवले जाते. दरेगावचे गवळी पाटील, सप्तशिखरांचा सुळका चढून निशाण लावतात. शिखरावर पोहचल्यानंतर जुना ध्वज काढून त्यांनी तेथे नवा ध्वज लावला जातो. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात या परंपरेला विशिष्ट मानले जाते. 500 ते 600 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ही परंपरा राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीच्या गडावर अखंडपणे चालू आहे.
देशभरातील भविकांनी घेतले दर्शन: देवी मंदिर सभामंडपात सायंकाळी शतचंडी योग व होमहवन विधी कार्यक्रमास पुरोहितांच्या मंत्रघोषात प्रारंभ झाला. हा विलोभनीय सोहळा पाहण्यासाठी खान्देस, मराठवाडा, विदर्भ नव्हेच तर गुजरात, राजस्थान व इतर राज्यातून भाविकांनी हजेरी लावली होती. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे 10 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्र उत्सव दरम्यान पुरोहित वर्ग, सर्व ट्रस्ट कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, यांसह जिल्हा पोलीस व महसूल प्रशासन विभाग आदी विशेष परिश्रम घेत आहेत.