नाशिक - दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना कळवण पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे व क्वालीस गाडी जमा करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवणमधील आठंबे परिसरात चौघांना अटक करण्यात आली.
मंगळवारी (१७ मार्च) पहाटे २ च्या सुमारास पोलीस पेट्रोलिंग करत असताना कळवण येथे एक संशयित क्वालीस गाडी आढळली. यावेळी पोलिसांनी चौकशी सुरू केली असता चोरट्यांनी गाडी घेऊन धूम ठोकली. नंतर पोलिसांनी पाठलाग सुरू केला. पोलीस मागे येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी आठंबे गावाजवळ गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून नागरिकांच्या साह्याने दुपारच्या सुमारास चौघा संशयितांना मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी पकडले. पोलिसांनी त्यांच्याजवळील कुकरी, कटावणी इत्यादी धारदार हत्यारे जप्त केली. त्यानंतर त्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.