मनमाड (नाशिक) - शहरात 2 मे ला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्या दृष्टीने ज्या-ज्या उपाययोजना करायच्या त्या सर्व करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनामाड पुन्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार, असे येवला विभागाच्या प्रभारी प्रांताधिकारी ज्योती कावरे यांनी सांगितले.
मनमाड शहरातील नगर पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्र व बफर झोन याचा आढावा घेतला. तसेच 4 दिवस बंद संपल्यानंतर कुठल्या भागात सुविधा सुरू करता येतील, कुठला भाग सील करावा लागेल, याबाबत चर्चा करण्यात आली.
कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या सर्व जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामधील 16 पैकी 14 अहवाल प्राप्त झाले असून 2 अहवाल प्रलंबित आहेत. मनमाड शहरात 4 दिवस कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाचे पुढील अहवाल प्राप्त होताच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिसूचनेसुणार शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा सुरू करण्यात येतील, असे आदेश कावरे यांनी दिले आहेत.
बैठकीमध्ये रुग्ण संख्या वाढली तर घरपोच सेवा कशी देता येईल? याबाबतही विचारविनिमय केला. तर जिल्हाधिकारी व राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेचे उल्लंघन न करता सर्वसामान्य नागरिकांना कशा सुविधा पुरविण्यात येतील यावर चर्चा करण्यात आली. यावेळी गेल्या 42 दिवसापासून कोरोनामुक्त असलेला आपला तालुका आपण पुन्हा कोरोनामुक्त करू, असा निर्धार करण्यात आला.
संपूर्ण सीमा सील करणे हाच उपाय -
या बैठकीत सर्व चर्चा बघता व उपाययोजना बघता मनमाड शहरात एकही कोरोना रुग्ण नव्हता. मात्र, काही बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांमुळे तो मनमाड शहरात दाखल झाला. त्यामुळे आता आहे तीच संख्या ठेवण्यासाठी शहराच्या व तालुक्याच्या संपुर्ण सीमा सील करून बाहेरून येणारे सर्व मार्ग बंद करून पुन्हा मनमाड कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ज्योती कावरे यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार योगेश जमदाडे, पोलीस उपविभागीय अधिक्षक समिरसिंग साळवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, तालुका आरोग्य अधिकारी ए. सी. ससाणे, बीडीओ गणेश चौधरी, संतोष डुंबरे, उपजिल्हा रुग्णालय प्रमुख जी. एस. नरवणे, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर, सुनील पवार आदि उपस्थित होते.