नाशिक - जिल्हा रुग्णालयांतर्गत गर्भपात केंद्रावर मागील वर्षभरात 520 मातांचा गर्भपात करण्यात आला आहे. गर्भधारणेपासून वीस आठवड्यांच्या आतील गर्भ हा स्वतंत्रपणे जगण्यासाठी समर्थ नाही,असे मानले जाते. या कालावधीतील गर्भ काढून टाकणे किंवा पडून गेल्यास गर्भपात मानला जातो. वैद्यकीय गर्भपाताच्या 1971च्या कायद्यानुसार शासनाने ठराविक परिस्थितीमध्ये गर्भपात करून घेण्याचा अधिकार महिलेला दिला आहे.
विशेष परिस्थितीत गर्भपात करण्यास मुभा - मातृत्व हे महिलेला मिळालेले वरदान मानले जाते. महिलांसाठीही ती समाधान देणारी बाब असते. पण कौटुंबिक, सामाजिक कारणास्तव गर्भपात करण्याची वेळ येते तेव्हा कायदेशीर दृष्ट्या अधिकृत केंद्रावर गर्भपात केला जातो. अशातच नाशिकच्या अधिकृत केंद्रावर मागील वर्षभरात 520 मातांचा गर्भपात करण्यात आला. गरोदर राहिल्यापासून वीस आठवड्यांच्या आत गर्भपात करता येतो. विशेष परिस्थितीत म्हणजेच, बलात्कारामुळे गर्भ राहिल्यास अथवा दिव्यांग महिला किंवा अल्पवयीन मुलगी यांना 24 आठवड्यांच्या आत मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रात प्रशिक्षित डॉक्टरांकडून गर्भपात करण्यात येतो.
गर्भपाताची कारणे - सध्याच्या युगात विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाल्याने पती-पत्नी हे दोघेही कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी नोकरीचा पर्याय निवडतात. अशात अनप्लांड म्हणजेच नको असलेली गर्भधारणा झाली असेल तर नोकरीमुळे गर्भपात करणाऱ्या महिलांचे प्रमाण जिल्हा रुग्णालयात वाढले आहे. बारा आठवड्यापर्यंत गरोदर महिलेला गर्भपात करण्यासाठी एक डॉक्टरांचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. तर वीस आठवड्यापर्यंत गरोदर महिलेला विशिष्ट परिस्थितीमध्ये गर्भपातासाठी दोन डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक असते. यात नको असलेली किंवा लादलेली प्रेग्नेंसी असू शकते किंवा बलात्कारातून गर्भधारणा झालेली असते.
कायदेशीर गर्भपाताची कारणे - कायद्यानुसार स्त्रीच्या जीवाला धोका उद्भवत असेल, मानसिक किंवा शारीरिक इजा होण्याची शक्यता असेल, अर्भकाला गंभीर शारीरिक मानसिक इजा, व्यंग येण्याची शक्यता असेल तर कायदेशीर गर्भापात करता येतो.
कोर्टाने काय म्हटले - सुप्रीम कोर्टाने म्हटल्यानुसार सर्व महिलांना सुरक्षित, कायदेशीर गर्भात करण्याचा अधिकार आहे. 24 आठवड्यापर्यंत अविवाहित महिला गर्भपात करू शकतात असेही कोर्टाने म्हटले.
गर्भधारणा राहण्यास किती काळ लागतो - शरीर संबंध ठेवताना निरोध, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर न केल्यास, गर्भधारणा लवकर होण्याची शक्यता असते. संबंध ठेवल्यानंतर साधारणतः 5 दिवस स्त्रीबीज, पुरुष बीजांचे फर्टिलायझेशन होत असते. त्यानंतर सहाव्या दिवसापासून 15 व्या दिवसापर्यंत फर्टिलाईज झालेले हे अंडे गर्भात रुजण्याची शक्यता निर्माण होते. तेव्हाच कोणतीही स्त्री गरोदर राहाते. म्हणजेच शरीरसंबंध ठेवल्यापासून साधारण पंधरा दिवसांचा काळ गरोदर राहण्यासाठी लागतो.
गर्भधारणेची लक्षणे - मासिक पाळी चुकणे, स्तन जड होणे, सतत दुखणे, कोरड्या उलट्या होणे अथवा सतत मळमळणे, प्रचंड थकवा जाणवणे, काहीही खाल्ल्यावर पोट फुगणे वा भरल्यासारखे वाटणे, सतत लघवीला जाणे,ताप आल्यासारखे जाणवत राहणे, सतत मूडस्विंग होणे, प्रत्येक गोष्टीत चिडचिड वाढणे इत्यादी लक्षणे साधारण पंधरा दिवस जाणवली तर, गरोदर असल्याची नक्कीच खात्री करून घेता येते. बऱ्याचदा या लक्षणांवरून कळत नसेल तर, प्रेगन्सी टेस्ट करून घ्यावी असा सल्ला डॉक्टर देतात.
हेही वाचा - Devendra Fadnavis On MVA : महाविकास आघाडी सरकारच्या काळात, मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न - फडणवीस