नाशिक - राज्यातील सुरगाणा त्र्यंबकेश्वर पेठ या भागातील नद्यांचे 16 टीएमसी पाणी गिरणा आणि गोदावरी खोऱ्यात टाकण्यासाठी माझा संघर्ष सुरू असल्याचे वक्तव्य दिंडोरी लोकसभेतील माकपचे उमेदवार जीवा पांडू गावित यांनी केले. १६ टीएमसी पाणी गुजरातला देऊन त्या ठिकाणी पर्यटन स्थळ आणि औद्योगिकरणासाठी मी लाँग मार्च काढून विरोध केला असल्याचेही गावित म्हणाले.
वन जमिनींसाठी 1978 पासून आम्ही लढलो. आदिवासी हक्काची वन जमीन मिळवून दिली. गेल्या वर्षात वनमजूर शेतकरी यासाठी लाँग मार्च काढून मागण्या मंजूर करून घेतल्या असून, आता आपल्या जिल्ह्यातील पाणी गुजरातमध्ये पळवण्याला आम्ही विरोध करीत आहोत. त्यामुळे दिंडोरी लोकसभा निवडणुकीत पाण्याचा प्रश्न, कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. महाराष्ट्रातील समुद्राला जाणारे 1 हजार 800 टीएमसी पाणी उचलले तर संपूर्ण महाराष्ट्र ओलिताखाली येऊ शकतो. पण आताचे सत्ताधारी आणि अगोदरचे सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न भिजत ठेवल्याचा आरोप यावेळी आमदार गावित यांनी केला. गुजरात सरकारचा समुद्राला 35 किलोमीटरचा बांध घालून पाणी सौराष्ट्राला नेण्याचा डाव असताना महाराष्ट्र सरकार मात्र शांत असल्याचे गावित म्हणाले.
माकपा हा निवडणुक ही परीक्षा मानत असून, त्याला आम्ही सामोर जात आहोत. दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपचे उमेदवार ध्येयनिष्ठ नाहीत. त्यांची विश्वासार्हता संपली पाहिजे. अनेक आमिषे देऊनही मी पक्ष बदलला नाही. माझी राजकीय कारकीर्द अजूनही जनतेसाठी आहे. मी अजूनही गावात राहतो. बाकीचे उमेदवार शहरात राहतात अशी खोचक गावित यांनी विरोधकांवर केली.