नाशिक- येथील नाशिकरोड बँक आॅफ इंडियाच्या शाखेच्या आवारात दुचाकी उभीकरुन बँकेत गेलेल्या महिलेचे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली. या घटनेतील संशयीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा- जनता युती सरकारला त्रासली असून आम्हाला पुन्हा सत्तेत बसवणार - बाळासाहेब थोरात
नाशिकरोड गुरुद्वाराजवळील आयकॉन प्लाझा इमारतीतील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत आलेल्या महिलेच्या स्कुटीतील डिक्कीतून चोरट्याने सोन्याचे दागिने पळविळे. अंबड लिंकरोड भागातील म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या मुमताज पठाण या मुलगा शाहरुख व मुलगी हिना यांच्यासोबत (एमएच 15 डीव्ही 1314) क्रमांकाच्या स्कुटीवरुन दुपारी बँकेत आल्या होत्या. त्यांनी बँकेच्या आवारातील जागेत स्कुटी उभी केली. त्या बँकेत गेल्यानंतर चोरट्याने स्कुटीच्या डिक्कीतून दोन मंगळसूत्र, चार अंगठ्या असे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी चोरुन नेली. पठाण सुमारे एक तासानंतर बँकेतील काम आटोपून स्कुटीजवळ आल्या असता त्यांना डिक्कीतील दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले.
या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त आर.आर. पाटील, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशीयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बँकेच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यावेळी स्कुटीच्या डिक्कीचे लॉक उघडून अज्ञान चोर फरार झाल्याचे दिसत आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या अधारे चोराचा शोध घेत आहेत.