नाशिक Jayat Patil Reply To Ajit Pawar : शुक्रवारी (1 नोव्हेंबर) रायगडमध्ये बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य केलं. 2019 साली ‘प्रदेशाध्यक्ष’ पदावरुन जयंत पाटलांनी प्रकाश सोळंके यांना शब्द दिला होता. पण, तो शब्द जयंत पाटलांनी पाळला नाही, असं अजित पवार म्हणाले. तसंच, दहा वेळा विचार करुन शब्द द्या, असा टोलाही पवारांनी जयंत पाटलांना लगावला. दरम्यान, अजित पवारांच्या या टीकेला आता जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील : यासंदर्भात नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असताना जयंत पाटील म्हणाले की, अजित पवारांचे आरोप चुकीचे आहेत. प्रकाश सोळंके यांना प्रदेशाध्यक्ष नाही, तर मंत्री व्हायचं होतं. मी बीड जिल्ह्यातून सीनिअर आहे, मला मंत्री करा अशी त्यांची अपेक्षा होती. याविषयी सोळंके यांची माझ्यासोबत चर्चा सुरू होती. तेव्हा अजित पवार आले आणि मला न विचारता त्यांनी कार्याध्यक्ष बनवण्याचं आश्वासन दिलं, यात माझा काही रोल नव्हता. त्यानंतर पक्षानं कधीच मला प्रदेशाध्यक्ष सोडा, प्रकाश सोळंके यांना प्रदेशाध्यक्ष करायचंय, असं सांगितलं नाही.
अंतर पडू दिलं नसतं : अजित पवार चुकीचा आरोप करत आहेत, मी मुद्दाम काही बोलत नाही. त्यांनी चुकीचे आरोप करू नये. जे पवार साहेबांनी प्रत्यक्ष केलं ते सर्व जनतेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. कोणी कोणाशी काय चर्चा केली ते चार महिन्यांनी सांगत असतील, त्यावर कसा विश्वास ठेवायचा? पूर्वी शरद पवारांशी अजित पवार यांनी काय चर्चा केली हे त्या दोघांनाच माहीत. आम्हाला शरद पवारांनी खासगीमध्ये जी भूमिका सांगितली त्याप्रमाणं आम्ही काम करतोय. तसंच अजित पवारांची शरद पवारांशी जी चर्चा झाली ती आम्हाला वेळोवेळी सांगितली असती तर हे अंतर आम्ही पडू दिलं नसतं, असंही जयंत पाटील म्हणाले.
काय म्हणाले होते अजित पवार : 2019 साली देवेंद्र फडणवीसांबरोबर सरकार स्थापन केलं. तेव्हा, प्रकाश सोळंके नाराज झाले. सोळंकेंना मंत्रीमंडळात यायचं होतं. सोळंकेंनी राजीनामा द्यायची तयारी केली होती. त्यांचं मत होतं की, मी पक्षासाठी काय कमी केलं? मलाही मंत्रीपद मिळालं पाहिजे. मात्र, सोळंकेंनी केलेली मागणी रास्त होती. त्यावेळी जयंत पाटलांनी म्हटलं, मी एक वर्ष अध्यक्ष राहतो, एक वर्षानंतर तुम्ही प्रदेशाध्यक्ष व्हा. तेव्हा प्रकाश सोळंकेंनी मान्य केलं. वर्षभरानंतर मी जयंत पाटलांना विचारलं, आपण सोळंकेंना शब्द दिलाय. यावर जयंत पाटलांनी सांगितलं, हे खरंय पण वरिष्ठ म्हणतात तूच प्रदेशाध्यक्ष राहा. मी म्हणालो, वरिष्ठांना सांगा मला जलसंपदा विभागातून वेळ मिळत नाही. मात्र, पुढं ढकलत, ढकलत अजून चाललंच आहे. हे बरोबर नाही, असं अजित पवार म्हणाले होते.
हेही वाचा -