नाशिक - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उडी घेतली आहे. समाजाची ढाल पुढे करून जातपंचायत सक्रिय झाल्याचा गंभीर आरोप अंनिसने केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये जातपंचायत हस्तक्षेप करत असून हा हस्तक्षेप मुख्यमंत्र्यांनी तातडीने थांबवावा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने महेंद्र दातरंगे यांनी नाशिक येथे केली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी महेंद्र दातरंगे आणि सदस्य कृष्णा चांदगुडे हे बुधवारी नाशिक येथे आले असताना पत्रकारांशी चर्चा करताना कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले की, पूजा चव्हाण प्रकरणाचा वनमंत्री संजय राठोड यांनी या पद्धतीप्रमाणे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. ते प्रकरण पूर्णतः चुकीच्या पद्धतीप्रमाणे केल्याचा आरोप करत ते म्हणाले की, याबाबत मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून तातडीने राठोड यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आजच्या परिस्थितीला या सर्व प्रकरणाला जातपंचायतीचा रंग दिला जात आहे आणि त्या माध्यमातून बंजारा समाजासमोर राठोड हे आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करण्याचा खटाटोप करीत आहेत. त्यामुळे तातडीने मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि राठोड यांना पदावरून दूर करावे, अशी मागणी केली आहे.
शक्तीप्रदर्शन केले ते चुकीचे आहे
तर महेंद्र दातरंगे यांनी सांगितले की, ज्या पद्धतीप्रमाणे पोहरादेवी येथे शक्तिप्रदर्शन करून राठोड यांनी बंजारा समाजासमोर निर्दोष असल्याचा पुरावा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, पोहरादेवी हे पीठ नाही तर ते शक्तीपीठ आहे. हे वनमंत्री राठोड यांनी लक्षात ठेवून त्या पद्धतीप्रमाणे समाजात आपले निर्दोषत्व सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, बंजारा समाजामध्ये जातपंचायतीला नाईक असे म्हटले जाते आणि या पद्धतीप्रमाणे नाईक यांनी पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन केले ते चुकीचे आहे. यामुळे शासनाने आता हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.