नाशिक- राज्यात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. नागरिकदेखील नियमांचे पालन करत आहेत. आज नाशिकमध्ये अनेक दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली आहेत. रविवारी होणाऱ्या जनता कफ्यूसाठी नाशिककर सज्ज असल्याचे आजच्या बंदमधून दिसत आहे.
हेही वाचा- दिवसभरातील महत्त्वाच्या दहा घडामोडींचा वेगवान आढावा...
नाशिकमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन विशेष काळजी घेत आहे. सुदैवाने नाशिकमध्ये अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण मिळून आला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 47 संशयित आढळले आहेत. त्यापैकी 41 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर उर्वरीत सहा जणांचा अहवाल येणे बाकी आहे. तीन रुग्णालयात कोरोनाकक्षात 13 संशयित दाखल आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून सराफ व्यवसायिकांनी तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून शहरातील कापड व्यापाऱ्यांनीदेखील आपली दुकाने बंद ठेवली आहेत. यापूर्वीच शहरातील शहरातील मोठी दुकाने, माॅल्स बंद आहेत. त्यामुळे आज शहारातील मुख्य बाजारपेठेत 60 ते 70 टक्के दुकाने बंद असल्याचे दिसून आले.
उद्या होणाऱ्या जनता कफ्युमध्ये औद्योगिक क्षेत्रातील उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय आयमा, लघु उद्योग भारती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या औद्योगिक संघटनांनी घेतला आहे.