नाशिक: ध्येय साध्य करण्याची मनात जिद्द असली तर यशावर मात करता येते. याचेच एक मुर्तिमंत उदाहरण म्हणजे दुर्गा देवरे. नाशिकच्या आंतराष्ट्रीय धावपटू दुर्गा देवरे हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. दुर्गा देवरे हिची एमपीएससी परिक्षेत उपजिल्हाधिकारी निवड झाली आहे. दुर्गा लवकरच प्रशासकीय सेवेत रूजू होणार आहे. तिने संपादन केलेल्या यशाने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तरूण-तरूणींना प्रेरणादायी ठरेल असा आंतराराष्ट्रीय धावपटू ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंतचा प्रवास राहिला आहे.
दुर्गा देवरेचा प्रेरणादायी प्रवास: खेळ आणि अभ्यास यांची योग्य सांगड घालत तिने एमपीएससी परीक्षेत प्राविण्य मिळवले आहे. दुर्गा हिने शाळेत असताना वयाच्या 8 व्या वर्षांपासून विविध खेळात सहभागी होण्यास सुरूवात केली. त्यात तिला यश मिळत गेले. वडील आणि भाऊ दोघेही स्पोर्ट्समन असल्याने तिला घरातूनच बाळकडू मिळत गेलेआणि ती धावण्याच्या स्पर्धेत एक एक शिखर पार करत गेली. दुर्गाने आता पर्यंत 4 आंतरराष्ट्रीय, 30 राष्ट्रीय तसेच 40 हुन अधिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहे. कोणाचाही आदर्श डोळ्यासमोर नाही. माझ्यासाठी मीच आदर्श आहे आणि त्यातूनच जगासमोर स्वतःचा आदर्श ठेवायला आवडेल, असे दुर्गा देवरे हिने यशाबद्दल सांगितले आहे.
खेळाची आवड: दुर्गाचे आजोबा कै वसंतराव देवरे हे देखील हॉलीबॉल खेळाडू होते. तसेच दुर्गाचे वडील देखील प्रमोद देवरे हे देखील राष्ट्रीय हॉलीबॉल खेळाडू यामुळे आजोब आणि वडिलांची प्रेरणा घेत तिच्यातही खेळाविषयी आवड निर्माण झाली. पण आपल्या आजोबा, वडील यांच्याप्रमाणे हॉलीबॉल मैदानाकडे न जाता, भाऊ प्रणव याच्यासोबत वयाच्या आठव्या वर्षापासून भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर साई प्रशिक्षक वीरेंद्र सिंग यांच्याकडे धावण्याच्या सरावासाठी जाऊ लागली. सिंग यांच्या मार्गदर्शनामुळे दुर्गाने अल्पावधीतच आंतरशालेय तसेच राज्य संघटनेच्या विविध वयोगटातील स्पर्धेत चांगली कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे, कविता राऊत, अंजना ठमके तसेच संजीवनी जाधव यांच्यानंतर आपणच मैदान गाजवणार असल्याची चूक दाखवून दिली.
प्रशासकीय सेवेचे स्वप्न: दुर्गा ही अनेक स्पर्धेत यश संपादन केले असले तरी ती अभ्यासात देखील तितकीच हुशार आहे. दहावीत तिला 92 टक्के मिळाले होते. दुर्गा हिने एम ए पदव्युत्तर शिक्षक पूर्ण केले आहे. प्रशासकीय सेवेत कामकाज करण्याचे तिचे स्वप्न होते यासाठी तिने स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली आणि पहिल्याच प्रयत्नात तिला यश मिळवले. खेळाडू असल्याने एका जागी सात- आठ तास बसून अभ्यास करणे तिच्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. मात्र तरी देखील जिद्द आणि चिकटीच्या जोरावर तिने एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. आता ती लवकरच उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होणार आहे. प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यावर महिला सबलीकरण, लहान मुलांचे प्रश्न तसेच प्रामुख्याने खेळाडूंचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दुर्गा देवरे हिने सांगितले.
चार पिढ्यानंतरची मुलगी दुर्गा: मला सखी मावशी नाही, सखी बहिण नाही, मुलगी नाही दोघा मुलांपैकी प्रमोदची एकुलती एक मुलगी दुर्गा, चार पिढ्यानंतर जन्मलेल्या दुर्गाच्या स्वरूपाने कुटुंबात कन्यारक्त प्राप्त झाले. तिच्या या यशाने आम्ही धन्य झालोय, अशी भावना एमपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या दुर्गा देवरे यांच्या आजी सुमनताई देवरे यांनी व्यक्त केली आहे.