नाशिक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेला परवानगी दिली. याच परिषदेत हिंदूविरोधात गरळ ओकण्यात आली. हिंदू समाज सडलेला आहे म्हणण्यापर्यंत शरजील उस्मानी यांची हिंमत गेली. उध्दव ठाकरे यांच्या सरकारमध्ये हिंदूंचा अपमान होत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबावामुळे कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा घणाघात भाजप अध्यात्मिक विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी केला आहे.
कोणत्याही विषयावर ज्ञान पाजळणारे विद्वान संजय राऊत कुठे गेले ?
वसंतस्मृती कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरजील उस्मानी यांची मानसिकता सडकी आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात हिंदू अपमानीत होत आहे. हिंदू समाजाला टार्गेट करणे हे महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर आहे का, असा सवाल भोसले यानी उपस्थित केला आहे. कोणत्याही विषयावर ज्ञान पाजळणारे विद्वान संजय राऊत कुठे आहेत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. दरम्यान येत्या दोन दिवसांमध्ये शरजील उस्मानीवर कारवाई करावी अन्यथा तिव्र आंदोलन करू असा इशाराही या पत्रकार परिषदेमध्ये भोसले यांनी दिला आहे.
हिंदुत्वाचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई नाही
बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार तुम्हाला चालवता येत नसेल तर आम्ही चालवू. सरकारने एल्गार परिषदेला परवानगी दिली होती त्याच बरोबर पोलीस बंदोबस्त दिला, मात्र गरळ ओकणार्या विरुध्द कारवाई केली नाही. देव, देश, धर्म हा विषय आला की काँग्रेसच्या पोटात दुखते, दारू आणि धंदा ही काँग्रेसची मानसिकता असून, इटलीचा डीएनए असलेल्यांना मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी परिस्थिती असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.