नाशिक - देशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारने देवळाली कॅम्प ते दानापूर (बिहार) ही पहिली किसान रेल्वे सुरू केली. या रेल्वेचा शुभारंभ केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून करण्यात आला.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हा केंद्रबिंदू मानत देशाच्या अर्थसंकल्पात शेतकरी वर्गासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना लवकरच टप्प्याटप्याने कार्यान्वित होणार आहेत. याचाच एक भाग म्हणून म्हणून शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक अधिक जलद करता यावी, त्यांचा नाशवंत शेतीमाल लवकरात लवकर देशाच्या मुख्य बाजारपेठेत विकता यावा, यासाठी भारतातील पहिल्या रेल्वेचा नाशिकच्या देवळाली कॅम्प येथून शुभारंभ करण्यात आला.
नाशिक हा शेतीप्रधान जिल्हा आहे. इथे कांदा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते. ही रेल्वे सुरू झाल्याने याचा मोठा फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.
किसान रेल्वेची वैशिष्टे -
1. देवळाली कॅम्प ते दानापूर प्रवास 31 तासांत पूर्ण करणार
2. वाटेत असलेल्या स्थानकावरुन 230 टन माल एकत्र करणार
3. किसान रेल्वेमध्ये 15 बोग्या, काही बोग्या वातानुकूलित
4. शेतकऱ्यांना कृषीमालाच्या विक्रीसाठी योग्य बाजार पेठ उपलब्ध होणार
5. किसान रेल्वेत निर्जंतुक आणि वातानुकूलितची व्यवस्था
6. किसान रेल्वे मार्ग देवळाली कॅम्प, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, ब्रह्मणपूर, खंडवा, इटारसी, जबलपूरमार्गे दानपूर
7. नियमित मेल आणि एक्स्प्रेसपेक्षा कमी भाडे
8. आठवड्यातून दोनदा धावणार
9. देवळाली ते दानापूर प्रतिटन भाडे 4 हजार 100 रुपये