नाशिक - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणी वाढत आहे. आज आलेल्या तीन अहवालात तब्बल २५ पोलीस कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या २५ जणांच्या अहवालानंतर एकट्या नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १४०वर गेलाय. तर नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधिताची संख्या ७३२ जाऊन पोहचली आहे.
कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस दलात भीतीचं वातावरण पसरलंय. सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची लागण होत असतांना दुसरीकडे पोलीस दलात मोठ्या प्रमाणात लागण झाल्याने पोलीस प्रशासन हादरून गेलंय. मात्र, याच काळात कर्तव्य बजावत असतांना पोलीस असुरक्षित असल्याचं दिसून येतंय.
मालेगावमध्ये सर्वसामान्य नागरिकांबरोबर कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांच्या टेस्ट मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह येत आहेत. मालेगावमध्ये कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १४० जाऊन पोहचला आहे. त्यामुळे पोलीस दलात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मालेगावमधील वाढता प्रादुर्भाव बघता वेगवेगळ्या तुकड्या बंदोबस्तासाठी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे राहण्यापासून बंदोबस्तापर्यंत उणिवा आहेत. याच काळात त्यांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील समोर आला आहे. कंटेन्मेंट झोन असेल, रेड झोन असेल अशा ठिकाणी पोलीसांना बंदोबस्त करावा लागतोय. याच काळात त्यांना पीपीई किट देणं गरजेचं आहे. सोबतच मास्कदेखील चांगल्या दर्जाचे असणं गरजेचं आहे. मात्र या सगळ्या सुविधा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जात असल्या तरी सत्यता मात्र वेगळी आहे. अनेक पोलीस वास्तव्यासाठी लॉन्सवर राहताय. आशा ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग पालन करणे कठीण जात आहे. त्यामुळे पोलीस दलात भीतीचं वातावरण पसरलं आहे.