नाशिक (येवला) - दिवस-रात्र सतत मेहनत करायची. लाईट येईल तेव्हा रात्री-अपरात्री आठून पिकाला पाणी देण्यासाठी दाऱ्यावर जायचे. मात्र, जेव्हा सोन्यासारखे पीक येईल तेव्हा मात्र, भरल्या हाताने जाऊन रित्या हाताने परत फिरायची वेळ शेतकऱ्यांवर सध्या टोमॅटो पीकाच्या बाबतती आली आहे. टोमॅटोच्या भावात कमालीची घसरण झाली आहे. या परिस्थितीत हतबल आणि संतप्त झालेल्या शेतकऱ्याने आपल्या टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या चरण्यास सोडून दिल्या आहेत. तसेच, आपले टोमॅटोचे पीक उपटून टाकत संताप व्यक्त केलाय.
येवला तालुक्यातील अंदरसुल गावातील शेतकरी ज्ञानेश्वर जाधव यांनी एक एकरमध्ये टोमॅटोचे पीक घेतले होते. मात्र, टोमॅटोच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत गेल्याने संतप्त होत या शेतकऱ्याने आपल्या उभ्या टोमॅटोच्या पिकात मेंढ्याचा चरण्यास सोडून दिल्या आहेत. तसेच, टोमॅटोचे पीक उपटून टाकत आपला संताप व्यक्त केला आहे.
कोणतं पीक घ्यावे शेतकऱ्याला प्रश्न
या शेतकऱ्याने टोमॅटोबरोबर ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर हेसुद्धा पीक घेतले होते. मात्र, त्यालाही भाव मिळत नसल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. आता कोणते पीक घ्यावे असा प्रश्न या शेतकऱ्याना पडला असून, आपल्या उभ्या पिकात मेंढ्या चरण्यास सोडत तसेच पीक उपटून टाकत आपला रोष त्याने व्यक्त केला आहे.
टोमॅटोला 3 ते 4 रुपये किलो भाव
टोमॅटोला प्रत्येक कॅरेटला 30 ते 40 रुपये भाव मिळत असल्याने 3 ते 4 रुपये किलो दर प्रमाणे टोमॅटो विक्री होत आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचे उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. जगाव की मराव असा प्रश्न शेतकरी आता विचारत आहेत. टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याचे, तसेच रस्त्याच्या कडेला फेकून देत असल्याचे चित्र सध्या येवला तालुक्यात दिसत आहे.