नाशिक - डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी (18 जून) ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने एकदिवसीय संप करण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात सातत्याने डॉक्टरांवरती वेगवेगळ्या कारणांमुळे हल्ले होत आहेत. त्यामुळे या काळात जीवाचे रान करूनही नागरिकांना वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर सुरक्षित नाहीत. शिवाय वैद्यकीय क्षेत्राचीही मोठी हानी होत आहे. या सर्वांचा निषेध करण्यासाठी आज आयएमएने संप पुकारला. नाशिक शहराच्या शालिमार येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यालयाबाहेर डॉक्टरांनी निदर्शने केली.
डॉक्टरांच्या मागण्या
- डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा पारित करण्यात यावा. या कायद्याचा मसुदा संसदेमध्ये तयार आहे, फक्त गृहमंत्रालयाच्या दुर्लक्षामुळे कायदा पारित होण्यापासून थांबलेला आहे. तो त्वरित पारित करण्यात यावा. जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवरील हिंसाचार हा भारतीय दंड संहितेच्या कक्षेत येईल.
- सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात याव्यात.
- रुग्णालयांच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करण्यात यावे.
- अशा हल्लेखोर व्यक्तींवरील खटले जलद न्यायालयात चालवावे.
या आंदोलनात आयएमए अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस, डॉ. मिलिंद भराडीया, सचिव डॉ. कविता गाडेकर, राज्य आयएमए कृती समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र कुलकर्णी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - राज्यातील आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट जाहीर; पाहा, तुमच्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट किती?