नाशिक - ग्रामीण पोलिसांच्या स्थनिक गुन्हे शाखा पथकाने इगतपुरीमधील दारू अड्ड्यांवर कारवाई केली. यावेळी गावठी दारू आणि बनवण्याचे विविध साहित्य असा सुमारे दोन लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हेही वाचा - प्रवाशाच्या अंगठ्याचा घेतला कडाडून चावा; रिक्षाचालक फरार
खैरगाव भागातील मोराचा डोंगर परिसरात गावठी दारू बनवली जात असल्याची माहिती, नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. यानुसार पोलीस निरीक्षक के. के पाटील यांनी या भागात छापा टाकला. त्याठिकाणी दारू तयार करण्याच्या दोन हातभट्ट्या आढळून आल्या. दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच गुणाजी गांगड आणि शांताराम आघान हे दोघे पळून गेले.
या कारवाईदरम्यान, एका हातभट्टीवर 3 हजार लिटर रसायन असलेले 16 प्लास्टिक व लोखंडी ड्रम, 200 लिटर मापाचे 15 प्लास्टिक व एक लोखंडी ड्रम, 10 लिटर दारू असा सुमारे 1 लाख 57 हजार 300 रुपयांचे साहित्य आढळुन आले. तर, दुसऱ्या हातभट्टीवरील कारवाईमध्ये 2 हजार लिटर रसायन असलेले 11 प्लास्टिक लोखंडी ड्रम, 15 प्लास्टिक व एक लोखंडी ड्रम, पाच लिटर दारू असा सुमारे 1 लाख 7 हजार 300 रुपयांचा मुद्दमाल जप्त करण्यात आला. दोन्ही घटनेतील साहित्यांची एकूण किंमत दोन लाख 64 हजार असल्याची माहिती आहे.