नाशिक: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुजंग तायडे वय (35 वर्षे, चुंचाळे घरकुल योजना, नाशिक) याने त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून बुधवारी रात्री पत्नीशी वाद घातला. यात संतप्त झालेल्या भुजंगने पत्नी मनीषा तायडे (वय 25) हिचा खून केला. त्यानंतर भुजंग याने स्वतः किचनमध्ये आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तायडे दाम्पत्याला दोन मुले असून एक मुलगा सातवीत तर दुसरा मुलगा नववीत शिक्षण घेत आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
वृद्धाला लुटले: आम्ही पोलीस आहोत, पुढे चेकिंग सुरू आहे. तुमचे सोने रुमालात बांधा असे सांगत दोघांनी करमसिंह पटेल (वय 80) यांच्याकडील 35 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (रुपये 50 हजार) तसेच दोन सोन्याच्या अंगठ्या आणि पुष्कराज खडा जवळपास 1 लाख 37 हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन धूम ठोकली. ही घटना नाशिक रोड तरण तलाव जवळ घटली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
34 लाखांची रोकड लंपास: नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहे. अशीच एक घटना नाशिकच्या टाकळी रोडवरील अनुसयानगर मधील व्यावसायिक प्रशांत खडताळे यांच्या बाबत घडली. त्यांच्या घरातून 34 लक्ष कडव, 80 हजार रुपयांची दागिने चोरट्यांनी लांबवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसया नगर सनशाइन सोसायटीत दुसऱ्या मजल्यावर प्रशांत खडताळे हे कुटुंब राहते. ते व्यवसायानिमित्त कोलकत्ता येथे दहा दिवसांपासून गेले होते. घरी परतल्यावर बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून 34 लाखाची रोकड व ८० हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडताळे यांना कोरोना काळात व्यवसायाला फटका बसल्याने त्यांनी मालमत्ता विकून त्यातून 34 लाखाची रोकड आणली होती. नवीन प्रॉपर्टी घेण्यासाठी त्यांनी घरातच पैसे ठेवले होते. आता पोलीस सोसायटीतील रहिवाशांकडे विचारपूस तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहे.