नाशिक - वाहन चोरी करून नंबर प्लेटमध्ये गैरप्रकार करून अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत. यामुळे वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनांच्या सुरक्षिततेत वाढ होणार असून गैरप्रकारांना आळा बसणार आहे. १ एप्रिलपासून नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अर्थात एचएसआरपी बसवण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहे. या नवीन नंबर प्लेटमुळे वाहन चोरी आणि जाळपोळ अशा प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. नवीन नंबर प्लेट अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मदतीने बनविण्यात येणार आहे. नंबर प्लेट टँम्परप्रूफ (मेटालिक) असणार आहेत. एकदा का वाहनावर ही नंबर प्लेट बसवली तर, ती पुन्हा काढता येणार नाही. यामध्ये एक विशिष्ट क्लिपद्वारे नंबर प्लेट वाहनांना लावण्यात येणार आहे. संपूर्ण ऑलिनिकपासून तयार करण्यात आलेली नंबर प्लेटमध्ये निळ्या चक्राचे होलोग्राम असेल, वाहन क्रमांकाच्या तिरप्या ओळीत इंडिया असे इंग्रजीत नाव असणार आहे.
१ एप्रिलपासून हा नवीन नियम लागू होत असून, संबंधित कंपनीने डीलरला सूचना केल्या आहेत. नवीन उत्पादित वाहनांमध्येही ही सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच जुन्या वाहनांना अशाप्रकारच्या नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार वाहन मालकांना ठराविक मुदत देण्यात येणार आहे. यानंतर या नियमांची कडक अंमलबजावणी केली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले.