नाशिक : हिंदू धर्मात महाशिवरात्री हा दिवस अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. मात्र या उत्सवाला गालबोट लागेल, असे कृत्य काही समाजकंटक करत असतात. भगवान शंकर हे भांग पितात, चिलीम ओढतात असा अपप्रचार केला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी दुधात भांग टाकून त्याचा प्रसाद म्हणून वाटप केले जाते. मात्र कुठलीही नशा करणे, हे धर्मशास्त्रात नसून याचे समर्थन होऊ शकत नाही. भगवान शंकरांनी पृथ्वीवर असलेले भांग गांजा, विष प्राशन या गोष्टी नष्ट करण्यासाठी त्याचे प्राशन केले होते. त्यामुळे काही समाजकंटकांनी त्याचा चुकीचा अर्थ घेत अपप्रचार केल्याचे महंत अनिकेत देशपांडे यांनी म्हटले आहे.
का प्राशन केली होती भांग ? समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर निघाले, ते प्राशन करण्यासाठी शिवशंकर पुढे आले. त्यांनी तो विषप्याला रिचवला. त्यामुळे त्यांच्या सबंध देहाचा दाह झाला. त्यांना शांत करण्यासाठी नानाविध उपाय केले गेले. अंगाला विभूती लावली, सर्प गुंडाळले मस्तकावर गंगा धारण केली, रुद्राक्षाच्या माळा घातल्या, शितल चंद्रमा कपाळावर चढवला, तरी गुण येईना. मग आयुर्वेदिक उपचार करून पाहिले. विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी विजया झाडाची पाने अर्थात भांगेची पाने, बेलपत्र, धोतऱ्याच्या फुलांचे दूध एकत्र करून शिवशंकराला पाजले होते. एवढे उपाय केल्यावर त्यांच्या शरीराचा दाह कमी झाला, पण पूर्ण शांत झाला नाही. शेवटी राम नाम घेतल्यावर ते पूर्णपणे शांत झाले अशी आख्यायिका आहे.
औषध म्हणून भांग योग्य : भांग ही औषधी वनस्पती फक्त रुग्णावर उपचार म्हणून वापरली पाहिजे. नशा म्हणून त्याचे सेवन करणे योग्य नाही. भांगेमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. परंतु औषधाची गरज रुग्णाला असते आणि औषधाची मात्रादेखील निश्चित असते. निरोगी माणसाला औषधाची गरज लागत नाही. तरीदेखील तो त्याचे सेवन करत असेल, तर त्याला व्यसनी म्हटले पाहिजे असे महंत सांगतात.
सर्वोच्च मुहूर्त म्हणजे महाशिवरात्र : भगवान शंकराची पूजा करण्यासाठी अत्यंत सर्वोच्च मुहूर्त म्हणजे महाशिवरात्र होय. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागून सर्वांनी भगवान शंकरांची आराधना करावी. अकाल मृत्यू, अपमृत्यू आदी सर्वांवरती विजय मिळावा. आपले जीवन परिपूर्ण व्हावं, दीर्घायुष्य मिळावे यासाठी भगवान शंकरांची पूजा करावी. घरी महादेवाची पिंड किंवा प्रतिमा असेल तर चौरंगावर विधीवत ठेऊन पूजा मांडावी. पिंड किंवा प्रतिमा नसेल तर वाळूची पिंड मांडून पूजा करावी. पहाटे स्नान करून पूजा करावी. या पूजेला देवाला अभ्यंगस्नान घालावे. पांढरी फुले, बेल व रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर वाहाव्यात. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृतानी स्नान घालावे. ऊॅं नम: शिवायसह शिवस्मरणात जागरण करावे. शिवपूजेत हळद-कुंकू न वापरता भस्म वापरावा, तर शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी.