नाशिक - शहरामध्ये आता चक्क हेल्मेट घालून गणपती बाप्पा वाहतूक नियमांचे धडे देणार आहे. मूर्तीकार योगेश टिळे यांच्या अनोख्या संकल्पनेतून हेल्मेटधारी बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली आहे. दरवर्षी दुचाकीच्या अपघातात डोक्याला मार लागून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने याविषयी प्रबोधन करण्यासाठी त्यांना ही संकल्पना सुचली.
नाशिक पोलिसांनी हेल्मेटसक्ती मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. काही प्रमाणात अपघातात होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणत वाढ देखील झाली. मात्र, असे असले तरी वाहनधारकांकडून अजूनही वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही.
मूर्तीकार योगेश टिळे यांनी बनवलेली ही मूर्ती आणि हेल्मेट शाडू मातीपासून बनवण्यात आल्याने पर्यावरणपूरक आहे. योगेश ही मूर्ती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना भेट देणार आहेत. तसेच पोलीस आयुक्तालयात या मूर्तीची स्थापना करावी, अशी विनंती करणार असल्याचेही टिळे यांनी सांगितले. आता हे हेल्मेटधारी गणपती बाप्पा तरी नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांना सद्बुद्धी देवो इतकीच मनोकामना टिळे करत आहे.