नाशिक - शहराच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी आणि रस्ते अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी नाशिक पोलिसांनी आजपासून नाशिक शहर व परिसरात हेल्मेट सक्ती मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेला विविध सामाजिक संस्था तसेच नागरिकांकडून समर्थन मिळत आहे.
नाशिक शहरातील १५ पोलीस ठाणे हद्दीतील २७ ठिकाणी ही मोहीम राबवली जात आहे. या जम्बो हेल्मेट सक्ती मोहिमेत जवळपास ४००हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा, वाहतूक पोलिसांचा सहभाग आहे. वाहतूक पोलिसांकडून शहर व परिसरात नेहमी हेल्मेटसक्ती कारवाई केली जाते. मात्र, तरीही बर्याच दुचाकी चालकांकडून हेल्मेटचा वापर केला जात नसल्याने वाढत्या रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या मृत्यूची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी हेल्मेट सक्ती कारवाईला पुन्हा चालना दिली आहे.
मागील ४ महिन्यात हेल्मेट नसल्यामुळे ३५ दुचाकीस्वारांनी जीव गमावला आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये १८ ते ३० वयोगटातील युवकांचा अधिक समावेश आहे. शहरात दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अवघ्या ४ महिन्यांच्या अपघातांची संख्या ३९ इतकी आहे. या अपघातात हेल्मेट नसल्याने डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचे प्रमाण अधिक आहे.
शहरात गंभीर गुन्ह्यापेक्षा अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने शहरात २७ पॉईंटवर नाकाबंदी करुन ही कारवाई करण्यात येत आहे.
- कोठे केली जात आहे ही कारवाई -
हॉटेल जत्रा, हॉटेल मिरची, ओमकार बंगला, काट्या मारुती पोलीस चौकी, रामवाडी ब्रिज, शालिमार चौक, काठेगल्ली, मुंबई नाका सर्कल, अशोका मार्ग, सद्भावना पेट्रोल पंप, भवानी सर्कल, हॉलमार्क चौक, एबीपी सर्कल, अंबड टी पॉइंट, रिलायन्स पेट्रोल पंप, त्रिमूर्ती चौक, सिडको हॉस्पिटल, कलानगर, पाथर्डी फाटा, डीजीपीनगर, केशवनगर, कोठारी कन्या शाळा, भैरवनाथ मंदिर, या ठिकाणी ही कारवाई केली जात आहे.