येवला (नाशिक) - येवला शहरासह तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्यातील अंदरसूल, नगरसूल, सायगाव या गावासह पूर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजाने पेरणी केलेल्या पिकांना या पावसाने संजीवनी मिळाली आहे.
तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणीच पाणी साचले आहे. तर, नगरसूल व सायगाव गावात चक्क या मुसळधार पावसाने शेतातून पाणी वाहिले असून काही ठिकाणी शेतावरील बांध फोडून पाणी वाहत होते. नगरसूल येथील काही शेतकऱ्यांवर आपल्या शेतात साचलेले पाणी काढून देण्याची वेळ आली. तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांना आलेल्या पावसाने झोडपून काढले असून, सायगाव येथील बंधाऱ्याला पाणी आले आहे.
उकाड्यापासून हैराण झालेल्या शहरवासीयांना आलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. येवला शहरातील स्वामी मुक्तानंद मैदानावर भाजी बाजारात आलेल्या जोरदार पावसाने पाणीच पाणी केले आहे. तर, भाजी विक्रेत्यांवर अचानक आलेल्या पावसामुळे दुकाने आवरण्यासाठी तारांबळ उडाली. एकूणच एक तास झालेल्या या पावसाने बळीराजा काही प्रमाणात सुखावला आहे.