नाशिक - शहरात चार दिवसात तापमानात वाढ झाली आहे. तापमानाने चाळीशी पार केली आहे. या असह्य उन्हामुळे नाशिककर हैराण झाले आहेत. दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत रस्त्यावर अघोषित संचारबंदी असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक शहराच्या कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. या कडाक्याच्या उन्हामुळे नाशिककर हैराण झाले आहेत. कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले आहे. हवामान खात्याने उत्तर व मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. बुधवारी हंगामातील सर्वाधिक ४०.९ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली.
मुंबईच्या कुलाबा वेध शाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवार ते शुक्रवारपर्यंत नाशिक, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यासह उत्तर व मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. उन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्याने नागरिकांनी काम नसल्यास सकळी ११ वाजल्यानंतर शक्यतो बाहेर पडणे टाळावे. बाहेर पडल्यास टोपी, उपरणे, स्कार्प तसेच पांढऱ्या कपड्यांचा वापर करावा. चेहऱ्याला प्रोटेक्शन क्रीम लावून बाहेर पडावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.