नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नाशिक शहरातील कोरोना केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र रात्रंदिवस काम करणाऱ्या मानधानावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना मागील दोन ते तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनाग्रस्तांसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आणि ग्रामीण स्तरावर सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये मानधरावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाल्याने कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात येत आहे. यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या पाच कोविड सेंटरवर नियुक्त डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉय यांच्यासह जवळपास 582 कर्मचाऱ्यांची सेवा जानेवारी महिन्याअखेरीस खंडित केली जाणार आहे. मात्र, याकर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यापासून वेतन रखडल्याने कोरोना योद्ध्यांवरच उपासमारीची वेळ आली आहे.
कोविड केअर सेंटर ठरले कोरोना बधितांसाठी संजीवनी
सप्टेंबर 2020 पर्यंत नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना कोविड सेंटरमध्ये खाट मिळेल की नाही अशी परिस्थिती होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला आणि हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. मात्र कोरोनाच्या पहिल्या टप्यात शासनाच्या सर्वच कोविड केअर सेंटरने महत्वाची भूमिका बजावली आणि एकट्या नाशिक शहरातील पाच कोविड केअर सेंटर मधून 40 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले.
..तर मनसे स्टाइल आंदोलन
कोरोना काळात मानधनावर नियुक्त आरोग्य कर्मचााऱ्यांची सरकरला आता गरज नसल्याने त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. त्यांना मागील तीन महिन्याचे थकीत वेतन मिळावे. तसेच नव्याने होणाऱ्या नोकरभरतीमध्ये त्यांना सामावून घ्यावे. याबाबत मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. सरकारने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे, नाही तर मनसे स्टाइल आंदोलन करू, असा इशारा मनसे पदाधिकारी अंकुश पवार यांनी दिला आहे.
कोविड सेंटरमधून बरे झालेले रुग्ण
कोविड सेंटर | कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या |
मेरी कोविड केअर सेंटर | 4 हजार 612 |
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय | 6 हजार 4 |
बिटको हॉस्पिटल व कोविड सेंटर | 13 हजार 454 |
समाजकल्याण वसतिगृह कोविड सेंटर | 12 हजार 580 |
ठक्कर डोम कोविड सेंटर | 2 हजार 470 |
हेही वाचा - नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा बोलबाला