नाशिक - येथील आरबीएल बँकेतून बोलत असल्याचे सांगून ओटीपीनंबर मिळवत हॅकर्सने 24 तासात 32 आरबीएल बँक क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 32 ग्राहकांच्या खात्यातील 16 लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने लांबविल्याचा सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरबीएल बँकेचे ग्राहक असलेल्या महेश विश्वनाथ मेखे यांना नुकत्याच घेतलेल्या क्रेडीट कार्ड अॅक्टिव्हेशनसाठी बँक कर्मचाऱ्याचा फोन आला आणि अवघ्या काही वेळातच त्यांच्या कार्डचा दुरुपयोग झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तत्काळ त्यांनी बँकेत संपर्क केला आणि सायबर पोलिसातही तक्रारही दिली. त्यानंतर अवघ्या 24 तासात फसवणूक झालेल्यांची संख्या 32 झाली. वारंवार सायबर जनजागृती करूनही नागरिक बळी पडत असल्याने पोलिसही हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
फसवणुकीचा आकडा तब्बल 16 लाख 6 हजार 693 रुपयांवर पोहोचला आहे. या प्रकारात ग्राहकांची चूक असली तरी बँकेची माहिती या गुन्हेगारांपर्यंत जाते कशी ? आरबीएल बँकेचा ग्राहकांची माहिती बाहेर गेली कशी ? बँकेचे सर्व्हर हॅक झाले का ?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचे आव्हान आता सायबर पोलिसांसमोर असले तरी ग्राहकांनीही फिशिंग कॉलच्या मोहात पडणे कितपत योग्य आहे ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये ऑक्टोबर महिन्यात 190 रुग्णांना डेंग्यूची लागण, 11 महिन्यात चार संशयित रुग्णांचा मृत्यू