नाशिक- नाशिकच्या आडगाव परिसरात गाडीसह ७ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अडवलेल्या वाहनात हा गुटखा आढ़ळून आला. पोलिसांनी वाहन तपासणी साठी अडवले असता चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करुन अडवले असता, या वाहनातून गुटख्याची वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी वाहनासह गुटखा जप्त केला आहे. यामध्ये हीरा, माणिकचंद, विमल आदि कंपन्याचा गुटखा आढ़ळून आला आहे.
नाशिक शहरातील पंचवटी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यात पेठ येथील संशयित शंकर येवला (३१) याला ताब्यात घेऊन आडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आले असून, आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.नाशिक शहरात दररोज लाखो रुपये किंमतीचा गुटखा चोरी छुप्या पद्धतीने आणला जातो, तरी शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला याचा कसलाही सुगावा लागत नाही. शिवाय संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नसल्याने, नाशिक शहरात बहुतांश दुकानांमध्ये गुटख्याची खुलेआम विक्री होताना दिसून येते. मात्र, याबाबत अन्न व औषध प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने विभागाच्या कामगिरीवर शंका व्यक्त होत आहे.