नाशिक : शनिवारी होत असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्या सह इतर मंत्र्यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातून जवळपास 25 हजाराहून अधिक लाभार्थी हे कार्यक्रमाला येणार आहेत. अशात त्यांची प्रवास, खाद्यपदार्थ देण्याचे नियोजन सरकारी यंत्रणेकडून करण्यात आले आहे. तसेच पावसाचा अंदाज घेत वॉटरप्रूफ मंडप तसेच मैदानावर चिखल होणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
आमदारांची असहमती: या कार्यक्रमासाठी सुमारे पाच कोटींचा खर्च होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे, यापूर्वी या उपक्रमासाठी एक कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. पण तो पुरेसा नसल्याने आता आमदारांच्या निधीतून प्रत्येकी 20 लाख रुपयाप्रमाणे निधी खर्च केला जाणार आहे, परंतु काही आमदारांकडून तो देण्यास असहमती दर्शवली आहे. काहींनी तर पालकमंत्र्यांनीच खर्च करावा असा सल्ला दिला आहे. एकही आमदाराने संमती पत्र दिले नसल्याने ते हा निधी देणार की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आणि जर निधी दिला नाही तर हा खर्च शासन कसा करणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
पालकमंत्र्यांना विश्वास: त्याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यां मार्फत संबंधित आमदारांना फोनही करण्यात येत आहेत. परंतु कार्यक्रमाला अवघा काही वेळ उरलेला असताना अद्याप आमदारांनी संमती पत्र दिले नसल्याची माहिती खुद्द पालकमंत्री दादा भुसे यांनीच दिली आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी हा कार्यक्रम असल्याने आमदार निधी देतील असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला आहे.
लाभार्थ्यांची संख्या ही 11 लाखांवर: या कार्यक्रमात जरी हजारोंच्या संख्येने लाभार्थींना प्रत्यक्ष आणले जाणार असले तरी जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या ही 11 लाखांवर गेली आहे. त्यामुळे आमदारांनी अद्याप निधी देण्याबाबत संमती दिली नसती तरी शासनाच्या चांगल्या कार्यक्रमासाठी सर्व आमदारांकडून सहकार्याच्या भावनेतून निधी मिळेल असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. विविध योजनेच्या माध्यमातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना एका छताखाली निर्धारित शुल्कात 200 हून अधिक वेगवेगळ्या योजनांचा कमीत कमी कागदपत्र आणि जलद मंजुरी अशा पद्धतीने लाभ प्रत्यक्ष स्वरूपात घेता येणार आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फटका : शासन आपल्या दारी उपक्रमासाठी जिल्हाभरातील लाभार्थींच्या वाहतुकीसाठी एसटीच्या 400 तर शहरासाठी सिटीलींकच्या 117 बसेस दिमतीला असणार आहेत,त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची चिन्हे असून शासनाच्या इव्हेंटला गर्दी जमवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जाणार आहे, लाभार्थ्यांच्या गर्दीसाठी प्रत्येक तालुक्यातून 25 ते 30 बसचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळ पासून कार्यक्रम संपेपर्यंत सिटी लिंकच्या 250 पैकी फक्त 133 बसेस प्रवासी वाहतुकीसाठी असतील, त्यामुळे विद्यार्थी तसेच कामगार वर्गाला याचा फटका बसणार आहे.
हेही वाचा