नाशिक - यंदा सर्वत्र ठिकाणी पाऊस चांगला झाला असल्याने पाण्याची अडचण कुठल्याही भागात भासणार नाही, तसेच सर्वच लाभक्षेत्रात देखील पावसाचे प्रमाण चांगले असल्याने शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचीही चिंता नाही. पण, पाण्याचे वाटप सुरळीत होण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजबध्द आरक्षण करुन त्याचबरोबर आकस्मिक मागणीचेही नियोजन करावे, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या मोठे, मध्यम व लघु प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठ्यातून सन 2020-21साठी आकस्मिक व पिण्याचे पाणी आरक्षित करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीकडून येणारी पाण्याची मागणी नोंदविण्यात यावी. तसेच आलेल्या मागणीनुसार पिण्याचे पाण्याचे आरक्षण करण्यात यावे. कुठेही पाण्याची कमतरता भासता कामा नये यासाठी पाणी आरक्षणाचे नियोजन योग्यप्रकारे करावे. तसेच यंदा पाऊस चांगला झाला असल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि इतर कामांसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही. जायकवाडी धरणही भरले आहे. त्यामुळे आपल्या धरणांमधून दरवर्षीप्रमाणे मराठवाड्याला देण्यात येणारे पाणी वाचणार आहे. त्याचप्रमाणे ज्या धरणांमध्ये काही प्रमाणात धरणसाठा कमी असेल तोही अवकाळी पावसात पूर्ण होईल, असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
दारणा, चणकापूर, गंगापूर आणि पालखेड समूह असे चार विभाग केले जातात. यामध्ये मोठे प्रकल्प एकूण 15, मध्यम प्रकल्प 9, लघु प्रकल्प 77 तर कोल्हापूर पध्दतीचे 12 बंधारे आहेत. जिल्ह्यासाठी 75 हजार 866 द.ल.घ.फू. पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. सध्या 72 हजार 581 द.ल.घ.फू. पाणीसाठा असून गेल्यावर्षी पेक्षा 4.38 टक्के इतका पाणीसाठी कमी आहे. तसेच आरक्षित पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने व तालुकास्तरावरुन गटविकास अधिकारी यांनी आकस्मिक मागणी लवकरात लवकर कळविण्याबाबतच्या सुचना भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
नाशिक पाटबंधारे विभाग, पालखेड पाटबंधारे विभाग व मालेगाव पाटबंधारे विभाग या तीन विभागांची मिळून शासनमान्य आरक्षणनुसार 15 हजार 220 द.ल.घ.फू. मागणी असून आकस्मिक मागणी 4 हजार 891 द.ल.घ.फू. एवढी आहे. त्यात नाशिक महानगरपालिक, थर्मल पॉवरस्टेशन एकलहरे, सिन्नर एमआयडीसी, महाराष्ट्र औद्योगिक यांत्रिकी संशोधन केंद्र, येवला वाईन पार्क, पालखेडवर मनमाड ग्रामपंचायत, येवला ग्रामपंचायत आणि मनमाड रेल्वेस्टेशन येथे मोठ्या प्रमाणावर पाणी आरक्षित करण्यात येते. चणकापूरमधून मालेगाव पाणीपुरवठा, महानगरपालिका पुरवठा, सटाणा महानगरपालिक, दाभाडी 11 गावे या मुख्य योजना असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे.
नाशिक महानगरपालिकेसाठी गंगापूर 3 हजार 800 दलघमी, दारणा 400 दलघमी, मुकणे 1 हजार 300 द.ल.घ.मी., असे एकूण 5 हजार 500 द.ल.घ.मी. इतके पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. तसेच मालेगाव महानगरपालिकेच्या मागणीनुसार चणकापूर धरणातून 1 हजार 399.89 द.ल.घ.फु. पाणी आरक्षित करण्यात आली आहे. याबरोबरच जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वापरासाठी देखील पाणी आरक्षण करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने पिण्याचे व शेतीसाठी देखील पाणी आरक्षित केले जाणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. कोरोनाकाळातील प्रलंबित असणाऱ्या कामांना गती देऊन कामे वेळेत पूर्ण करण्याबाबतच्या सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात आहेत.
हेही वाचा - महावितरणचा मनमाडकरांना वाढीव बिलाचा शॉक; ग्राहक संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा