नाशिक - महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी नागरिकांना संबोधित केले.
शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. त्या दृष्टीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 या माध्यमातून एक मोठा दिलासा राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिला आहे, या योजनेत दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ झाल्याने या कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची आधार लिंकिंग करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कमी वेळात कारवाही पूर्ण केली आहे. जवळपास नाशिक जिल्ह्यातील 1 लाख 36 हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
गरीब आणि गरजूंना केवळ १० रुपयात 'शिवभोजन' उपलब्ध करून देण्याच्या योजनेचे जिल्ह्यात ४ ठिकाणी उद्घाटन होत असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या योजनेची व्याप्ती यथावकाश वाढवली जाणार आहे. जिल्ह्यात विविध कामांसाठी येणाऱ्या गरीब आणि गरजू नागरिकांना चांगल्या दर्जाचे जेवण कमीत कमी दरात देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही भुजबळ म्हणाले.
नागरिकांचे प्रश्न विभागीय स्तरावर सोडवण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याद्वारे नागरिकांना कोणत्याही कामासाठी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. नागरिकांना उत्तम सेवा देण्याचे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे आणि नागरिकांचा हक्क देखील आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सेवा कायद्यामध्ये ८१ सेवांचा अंतर्भाव करून पूर्वीच्या २० सेवा मिळून सेवांची १०० गाठली आहे. आजपासून या सर्व सेवा नागरिकांना त्यांचा हक्क म्हणून दिल्या जातील, १०० सेवा देणारा नाशिक राज्यातील प्रथम आणि एक मात्र जिल्हा आहे. यासाठी मी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करतो, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
महिलांची सुरक्षितता हा देखील शासनाचा अग्रक्रम आहे. आज अनेक कामांसाठी सावित्रीच्या लेकी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असताना महिलांना सुरक्षितता प्रदान करणे गरजेचे असल्याचे भुजबळ म्हणाले. त्यादृष्टीने शहर पोलिसांमार्फत राबविल्या जाणाऱ्या निर्भया योजनेचे त्यांनी कौतुक केले. नाशिक जिल्ह्याला मोठा पौराणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. जिल्ह्याने यावर्षी १५० व्या वर्षात पदार्पण केलंय, यानिमित्ताने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जिल्हाची पूर्ण वैशिष्ट्ये आणि शक्तिस्थळे संपूर्ण जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा - सहा वर्षांपासून पांडाणे तलाठी कार्यालय बंद; ग्रामस्थांचे हाल
या कार्यक्रमात पोलीस विभागासह, आरोग्य, महिला व बालविकास, अग्निशमक वन विभाग, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संचालन केले. यावेळी विविध क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हेही वाचा - प्रजासत्ताक दिनानिमित्त मनमाडमध्ये 'एकात्मता रॅली'