नाशिक - कोरोना आढावा बैठकीत भाजप आमदार डाॅ. राहुल आहेर यांनी थेट जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांच्या दाव्याची पोलखोल करत सरकारी दावे आणि प्रत्यक्ष आकडेवारी यातील तफावत पुराव्यासाहित आक्रमकपणे मांडली. यावेळी त्यांची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी खडाजंगी झाली. आरोप करण्यासाठी बैठक नव्हती तर उपाययोजनांबाबत बैठक होती, असा टोला भुजबळ यांनी डाॅ. आहेर यांना लगावला.
हेही वाचा - येवल्यात लसीकरणला तोबा गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
जिल्हा नियोजन भवनात आज कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यावेळी आमदार डाॅ. आहेर यांनी आक्रमक भूमिका घेत कागदावरच कशा उपाययोजना केल्या जात आहेत, यावर तोफ डागली. प्रशासनाच्या आरोग्य उपाययोजनांच्या दाव्यांची त्यांनी पोलखोल केली. कोविड हॉस्पिटलच्या नावाखाली इतर रुग्णांना रुग्णालयांत जागा मिळत नाही. उपचार, सरकारी दावे आणि आकडेवारी यातील तफावत, पुराव्यासहित आमदार राहुल आहेर यानी मांडली. यावेळी त्यांची पालकमंत्री भुजबळ यांच्यासोबत खडाजंगी झाली. जिल्हा रुग्णालयात बेड संख्या वाढविण्यात आली नाही, हा आक्षेप भुजबळांनी फेटाळून लावला. यावेळी डाॅ. आहेर यांनी संदर्भ रुग्णालय नाॅन कोविड, तर जिल्हा रुग्णालय कोविड म्हणून घोषित करावे, जेणेकरून संदर्भमध्ये इतर उपचार केले जातील, अशी मागणी केली.
हेही वाचा - बाजार समिती बंद ठेण्याबाबत लोकप्रतिनिधीशी चर्चा करणार - छगन भुजबळ