नाशिक Grapes Problem In Nashik : जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे दक्षांची निर्यात थांबली आहे. बागलाण तालुक्यातून या आठवड्यात 50 ते 60 कंटेनर रशियासाठी रवाना होणार होते. मात्र स्टोरेजमध्ये द्राक्षांना क्रॅक जाण्याची भीती तसेच तयार होण्याच्या मार्गावर असलेल्या द्राक्ष मालाला बसलेला अवकाळीचा फटका, यामुळं निर्यातीला ब्रेक लागला आहे. निर्यात सुरू होण्यास अजून दोन आठवडे लागतील अशी माहिती, द्राक्ष निर्यातदारांनी दिलीय. तसेच दुसरीकडे हिवाळ्यामुळे द्राक्ष बागांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. एकूणच द्राक्ष बागायदार अडचणी सापडला आहे.
द्राक्षाची पंढरी म्हणून नाशिकची ओळख : भारत देशामध्ये द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. द्राक्षाची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. यावर्षी जिल्ह्यात जवळपास 63 हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड करण्यात आली आहे. राज्यातील 90 टक्के द्राक्ष नाशिक जिल्ह्यातून निर्यात होतात. नववर्षाच्या सुरुवातीला रशिया तसेच युरोप खंडात नाशिक जिल्ह्यातून जवळपास 250 ते 300 मॅट्रिक टन द्राक्षे रवाना होतील अशी शक्यता कृषी विभागाने वर्तवली होती. मात्र अशात पुढील आठ आठवडे तरी अवकाळी पाऊस आणि गारपीटचा फटका द्राक्षाला बसायला नको. सध्या नाशिकसह सांगली भागातील द्राक्षांची निर्यात देखील थांबली आहे. फक्त सटाणा भागातून किरकोळ निर्यात होत होती, परंतु त्यालाही मागील आठवड्यापासून ब्रेक लागला आहे.
हे करावेत उपाय : ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वेलीवरील चिरलेले, सडलेले मनी आधी काढून टाकावेत. त्यानंतर बागेत क्लोरीन डाय ऑक्साईड 50 पीपीएम या प्रमाणात फवारणी करावी. यामुळं रेसीड्युची समस्या राहत नाही. सध्या घडांवर फवारणी न करता जमिनीवर कीटकनाशकांची फवारणी करावी. कायटोसॅन 1.5 ते 2 मिली प्रति लीटर फवारणी केल्यास मण्यांचे चिरणे कमी होईल अशी माहिती, द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक प्राध्यापक राजेंद्र बिऱ्हाडे यांनी दिली.
म्हणून निर्यातीला ब्रेक लागला : सध्या थंडीमुळे दव पडत असून द्राक्ष बागांचे नुकसान होत आहे. त्याचा परिणाम निर्यातीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या द्राक्षाची निर्यात 90 टक्के थांबली आहे. हवामान समतोल झाले तर लवकरच या संकटातून द्राक्ष बागायतदार बाहेर पडू शकतील. रशिया, युरोपसाठी कंटेनर रवाना होणार होते. पण त्यालाही ब्रेक लागला आहे, असं द्राक्ष बागायतदार संघटनेचे माजी विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी : नाशिक जिल्ह्यात मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात गारपीट,अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष, कांदा, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून माहिती घेतली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी मागणी केली.
हेही वाचा -