नाशिक - गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून बंद असलेली मालेगाव यंत्रमाग व्यवसायाची 'खडखडाट ' आता पुन्हा सुरू होणार आहे. मालेगावमधील कंटेंनमेंट झोन वगळून यंत्रमाग सुरू करण्यात यावे, असे शासनाकडून निर्देश प्राप्त झाल्याने त्यादृष्टीने पाऊले उचलण्यास मालेगाव प्रशासनाने सुरुवात केली आहे. मात्र यंत्रमाग सुरू करताना कोरोनाचा प्रसार होणार नाही, यासाठी फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझेशन आणि मजुरांची वैद्यकीय तपासणी आदी बंधनकारक करण्यात आले आहे.
मालेगावचा आर्थिक कणा म्हणून यंत्रमाग व्यावसायाची ओळख आहे. मात्र जिल्ह्यात कोरोनाने थैमान घतल्यानंतर मालेगाव हे कोरोनाचे जिल्ह्यातील सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरले. त्यामुळे याठिकाणी सुमारे ३ लाख यंत्रमाग बंद झाले होते. दरम्यान या व्यावसायावर आधारित अनेक गोरगरिब कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली. मात्र आता शासनाने निर्देश दिल्यानंतर पुन्हा मालेगावतील यंत्रमाग सुरू होणार असल्याने या मजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत मालेगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यंत्रमाग धारकांची बैठक घेऊन यंत्रमाग व्यवसाय सुरू करण्याबाबत चाचपणी केली. गुरुवारी यासंबंधी अधिकृत अधिसूचना काढण्यात आली आली. याबाबत नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी अधिक माहिती दिली.
नाशिकदरम्यान प्रशासनाने परवानगी दिल्याने यंत्रमाग कारखाना मालकांनी समाधान व्यक्त करत शासनाच्या निर्देशानुसार कामकाज सुरू करणार असल्याचे सांगितले.
शहरात ६ हजार यंत्रमाग कारखाने आहेत. त्यात दररोज लाखो मीटर कापड तयार होते. या यंत्रमागांवर मालेगावमधील अडीच लाखांपेक्षाही जास्त लोकांच्या आयुष्याचा रहाटगाडा चालतो. दरम्यान सुमारे दोन महिन्यांनंतर याठिकाणचे यंत्रमाग सुरू होणार असल्याने गोरगरीब मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.