नाशिक - केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देण्यासंदर्भातील बोगस लिंक व्हायरल होत असतात. आता दोन कोटी युवकांना मोफत लॅपटॉप देण्याच्या नावाखाली त्यांची माहिती भरण्यासंदर्भातील लिंक व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या लिंकसंबंधी तक्रारी मिळाल्यानंतर ही लिंक सायबर क्राइम पोलिसांनी ब्लॉक केली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी, अशाच प्रकारे विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी खालील लिंक भरून पाठवा, असे आवाहन केले जायचे. पंतप्रधान आवास योजना, सोलर पॅनलसाठी मदतीची योजना अशा प्रकारच्या विविध योजनांचा लाभ करणाऱ्या लिंक व्हायरल होत असताना, नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याच्या आनंदात विद्यार्थ्यांना मेक इन इंडियाच्या माध्यमातून दोन कोटी युवकांना मोफत लॅपटॉप देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी 30 लाख युवकांना यशस्वीरित्या लॅपटॉप मिळाले आहेत. आता तुम्हाला संधी आहे, अशा प्रकारची गोंडस आवाहन करून युवकांना माहिती भरण्यासाठी भाग पाडले जात आहे.
शासनाच्या कोणत्याही योजनेची माहिती प्रधिकृत यंत्रणेच्या माध्यमातून मिळते. लिंकवरून माहिती भरून लाभ मिळत नाही, असे असतानाही, या प्रकारची लिंक व्हायरल झाली होती. सायबर तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे बोगस लिंक देऊन शासनाच्या नावाखाली माहिती संकलन करणे सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही लिंक ब्लॉक करण्यात आली आहे.