नाशिक- कोरानाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना अहवाल तत्काळ प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये प्रयोगशाळांची संख्या वाढवण्याचे विचाराधीन होते. त्यादृष्टीने खासदार हेमंत गोडसे यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या शासकीय कोरोना टेस्टींग लॅबच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी 200 अहवाल मिळणार असून, भविष्यात अहवाल मिळण्याचे प्रमाणही वाढणार असल्याचे मत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
खासदार हेमंत गोडसे यांच्या 1 कोटी रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या शासकीय कोरोना टेस्टींग लॅबचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा रुग्णालय येथे सुरू करण्यात आलेल्या टेस्टींग लॅबमुळे तत्काळ कोरोना रुग्ण नमुने तपासणीची सोय होणार आहे. लॅबसाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत व या लॅबचे कामकाज लवकरच सुरू होईल, असे भुजबळ म्हणाले.
तसेच, किमान कालावधीमध्ये जिल्हा रुग्णालय व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या अद्ययावत लॅबचे निर्माण केले आहे. टेस्टींग लॅबचा उपयोग कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर इतर साथीच्या आजारांच्या निदानासाठी कायमस्वरुपी होणार असल्याचे भुजबळ यानी सागितले.
हेही वाचा- तपोवनातील 'त्या' हत्येचा लावला आडगाव पोलिसांनी छडा..!